बॉलीवूड अभिनेत्रीच्या वाढदिवसाला हॉटेलमध्ये सुरू होती झिंगाट ड्रग्स पार्टी, पोलिसांनी रंगेहात केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 11:01 AM2021-06-15T11:01:14+5:302021-06-15T11:05:31+5:30

Crime News: मुंबईमध्ये एका प्रसिद्ध अभिनेत्रीला वाढदिवसाच्या पार्टीला ड्रग्स आणणे चांगलेच महागात पडले आहे. ही पार्टी ऐन रंगात आली असताना पोलिसांना कुणीतरी गुप्त माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी हॉटेलवर धाड टाकून या अभिनेत्रीला मित्रांसह अटक केली.

मुंबईमध्ये एका प्रसिद्ध अभिनेत्रीला वाढदिवसाच्या पार्टीला ड्रग्स आणणे चांगलेच महागात पडले आहे. ही पार्टी ऐन रंगात आली असताना पोलिसांना कुणीतरी गुप्त माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी हॉटेलवर धाड टाकून या अभिनेत्रीला मित्रांसह अटक केली. या अभिनेत्रीचे नाव नायरा नेझल शाह असल्याचे समोर आले आहे.

ही घटना मुंबईतील सांताक्रूझ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. इथे एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये बॉलीवूड अभिनेत्री नेहल शाह तिचा वाढदिवस साजरा करत होती. ती ड्रग्ससोबत पार्टी करत होती. दरम्यान, पोलिसांनी रात्री उशिरा छापा टाकत या ड्रग्स पार्टीचा उलगडा केला.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, कालच्या रात्री सुमारे ३ वाजता एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये धाड टाकण्यात आली. तिथे बॉलीवूडमध्ये छोट्यामोठ्या भूमिका करणारी एक अभिनेत्री आणि तिचे मित्र ड्रग्सचे सेवन करताना रंगेहात सापडले. त्यांना अटक करण्यात आली असून, सांताक्रूझ पोलिसांनी यासंदर्भात एनडीपीएस अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

सांताक्रूझ पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी ज्ञानेश्वर गणोरे यांना याबाबतची गोपनीय माहिती मिळाली होती. एक बॉलीवूड अभिनेत्री पंचतारांकित हॉटेलमध्ये मित्रांसोबत पार्टी करत आहे, त्यात ड्रग्सचाही वापर केला जात आहे. असे या गुप्त माहितीत म्हटले होते.

याच माहितीच्या आधारावर मुंबई पोलिसांनी या पंचतारांकित हॉटेलात दाखल होत बॉलिवूड अभिनेत्रीच्या ड्रग्स पार्टीवर छापा टाकला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनेत्री नेहल शाह हॉटेलच्या एका रूममध्ये चरसचा वापरही करत होती. पोलिसांनी पार्टीमध्ये उपस्थित असलेल्या नेहल शाह आणि तिचा मित्र आशिक हुसेन याला अटक केली.

दरम्यान, सोमवारी सांताक्रूझ पोलिसांनी दोघांनाही कोर्टात हजर केले. तिथे कोर्टाने त्यांची जामिनावर मुक्तता केली. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. नायरा नेहल शाह हिने बॉलीवूडसोबतच दोन तेलगू चित्रपटातही काम केले आहे.

Read in English