धुंद वरात! पिंजऱ्यात बंदीस्त बारबाला रात्रभर नाचत होत्या; पहायला रस्त्यावर तोबा गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 03:16 PM2021-06-09T15:16:37+5:302021-06-09T15:27:49+5:30

Barbala Dancing in Cage overnight: बिहारच्या आरामधून सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये काही बारबाला पिंजऱ्यात बंद आहेत आणि नाचत आहेत.

बिहारच्या आरामधून सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये काही बारबाला पिंजऱ्यात बंद आहेत आणि नाचत आहेत. कोरोनाच्या काळात भर रस्त्यावर लॉकडाऊनच्या नियमांचे एवढ्या मोठ्या गाजावाजात उल्लंघन झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (Barbala dancing overnight in cage at bihar's Bhojpur)

हा प्रकार भोजपूर जिल्ह्यातील कोईलवर गावातला आहे. एका लग्न समारंभावेळी बारबालांना पिंजऱ्यात ठेवून त्यांच्याकडून डान्स करवून घेतला गेला. या तरुणी रात्रभर पिंजऱ्यात डान्स करत होती, आणि लोक हुल्लडबाजी करत होते.

बिहारमध्ये महिला सशक्तीकरणासाठी महिलांसाठी 50 टक्के आरक्षण देण्यात आले आहे. अशावेळी लग्न समारंभात बार बालांना अशाप्रकारे पिंजऱ्यात कैद करणे आणि त्यांना डान्स करायला लावणे लोकांच्या मानसिकतेवर गंभीर प्रश्न उपस्थितक करत आहे.

कोईलवरच्या वार्ड नंबर 10 च्या मियांचक मोहल्ल्यामध्ये राहणारे मोहम्मद नकीब यांच्या मुलीचे लग्न होते. वरात भागलपूरच्या ग्रामीण भागातून तिथे पोहेचली होती. वरातीमध्ये या डान्सरना पिंजऱ्यात बंद करण्यात आले होते.

लोक या नाच गाण्याचा बाहेरून आनंद घेत होते. या तरुणींना नाचण्यासाठी प्रत्येकी 4000 रुपये देण्यात आले होते, आणि त्यांना मुझफ्फरपूरहून आणल्याचे सांगितले जात आहे.

एवढे मोठे अंतर ते देखील वाजत गाजत, बारबालांना नाचवत वरातीने पार केलेले असताना एकाही पोलिसाच्या निदर्शनास कसे आले नाही, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. तर दुसरीकडे पोटाची भूक भागविण्यासाठी आम्हाला हे करावे लागते, असे या बारबालांनी सांगितले आहे. स्थानिक पोलीस वरून आदेश आल्याने आता चौकशी करत आहे.

व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, पिंजऱ्याला टाळे लावण्यात आले आहे आणि तरुणी आतमध्ये डान्स करत आहेत. पिंजऱ्यामध्ये एवढी कमी जागा होती, की जर ती तरुणी नाचून दमली तर साधी बसुही शकत नव्हती.

या प्रकरणी BDO बीबी पाठक यांनी सांगितले की, सोशल मीडियावरून आम्हाला या कृत्याची माहिती मिळाली आहे. पोलीस ठाण्याशी बोलून याचा तपास सुरु केला आहे. चौकशीनंतर दोषींवर कडक कारवाई केली जाईल.

स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार अशा प्रकारचे बारबालांचे डान्स रोजच होत असतात. मात्र, अशाप्रकारे बंदीस्त करून तरुणींकडून डान्स करवणे योग्य नाही.