खळबळजनक! भाजपा नेत्याच्या कुटुंबातील ६ जणांची तलवारीनं हत्या; मृतांमध्ये २ लहान मुलांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 12:44 PM2020-07-16T12:44:28+5:302020-07-16T12:50:34+5:30

मध्य प्रदेशातून एक भयानक घटना उघडकीस आली आहे. येथे एकाच कुटुंबातील ६ जणांची तलवारीने वार करुन हत्या करण्यात आली आहे. मारेकऱ्यांसमोर कुटुंबातील जो कोणताही सदस्य आला त्याच्यावर तलवारीने वार करण्यात आले.

या घटनेनंतर संतापलेल्या गावकऱ्यांना दोन मारेकऱ्यांना पकडून लाठी दांड्याने मारहाण केली त्यात एकाचा मृत्यू झाला आहे.

यासंदर्भात पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, घटनेच्या वेळी चौकीवरील कर्मचारी कमी होते परंतु इतर पोलिस ठाण्यांमधून पोलिस दलापर्यंत पोहोचल्यानंतर तेथील एका आरोपी पळून जात असताना त्याच्या पायावर गोळी मारली आणि त्याला अटक केली आहे.

मंडला जिल्ह्यातील बिजदांडी पोलिस स्टेशन परिसरातील मनेरी चौकी येथे ६ जणांच्या खळबळजनक हत्येचा प्रकार उघडकीस आला आहे. सोनी कुटुंबातीलच दोन गटात मालमत्तेच्या वादामुळे ही घटना घडली आहे.

एका कुटुंबातील दोन जणांनी दुसर्‍या कुटूंबावर धारदार शस्त्राने हल्ला करत सदस्यांना ठार मारले. मयत राजेंद्र सोनी हा भाजपाचा एक वरिष्ठ नेता असल्याचं म्हटले जात आहे. या हत्याकांडात त्याच्याच कुटुंबातील ६ जण ठार झाले.

ठार झालेल्यांमध्ये दोन मुलांचा समावेश आहे. दोन आरोपींपैकी एकाची ग्रामस्थांनी मारहाण करुन हत्या केली आहे.

घटनेच्या संदर्भात असे सांगितले जात आहे की, वडिलोपार्जित मालमत्तेवरून सोनी कुटुंबातील दोन भावांच्या कुटुंबात दीर्घकाळ वाद सुरू होता. या वादामुळे एका भावाच्या कुटुंबातील दोन जणांनी घरातील इतर सदस्यांवर धारदार शस्त्राने हल्ला केला.

मयत राजेंद्र सोनी, जे भाजपाचे ज्येष्ठ नेते असल्याचं म्हटले जाते, ते व्यापारी होते. दुकानातच आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला, त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच त्याच्या कुटुंबातील ५ सदस्यांचीही हत्या करण्यात आली. यात सात ते दहा वर्षांच्या मुलांचा देखील समावेश आहे

मृतांमध्ये राजेंद्र सोनी (५८), त्याचा भाऊ विनोद सोनी (४५) वर्षे, त्याचा पुतण्या ओम सोनी (९), भाची प्रियांशी सोनी (७), मुलगी प्रिया सोनी (वय २८) आणि त्यांची बहीण दिनेश सोनी (५०) यांचा समावेश आहे. संतोष सोनी (वय ३५) या हत्या प्रकरणातील आरोपींमध्ये आहे, तर आणखी एक आरोपी हरी सोनी पोलिस कोठडीत आहे.

हत्येचा आरोप सोनी कुटुंबातील संतोष सोनी आणि हरी सोनी यांच्यावर आहे. या घटनेने संपूर्ण भागात दहशतीचे व तणावाचे वातावरण आहे. जिल्ह्यातील दुर्गम भागात असलेल्या मनेरी गावात पोलीस स्टेशन आहे, पोलीस उशिरा पोहचल्याने स्थानिक लोक संतापले होते. पोलिस आल्यानंतर ग्रामस्थांनी आरोपीवर दबाव आणला आणि एका आरोपीला मारहाणही केली.