अम्फान वादळ: दहा हजार कुटुंबीयांच्या मदतीसाठी सौरव गांगुली रस्त्यावर!

भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनं पुन्हा एकदा सामाजिक भान जपल्याची प्रचिती आली.

अम्फान वादळाचा सर्वाधिक कोलकाताला फटका बसला. या वादळामुळे नुकसान झालेल्या 10 हजार कुटुंबीयांच्या मदतीसाठी गांगुली रस्त्यावर उतरला आहे.

कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठीही गांगुलीनं मदतीचा हात पुढे केला होता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा ( बीसीसीआय) अध्यक्ष गांगुलीनं केंद्र सरकारला 50 लाख देण्याचा निर्णय घेतला होता.

गांगुलीनं पश्चिम बंगाल सरकारलाही त्याच्या परीनं मदत केली होती. लॉकडाऊनच्या संकटात इस्कॉनलसोबत त्यानं दररोज 20 हजार लोकांच्या जेवणची सोय केली होती. शिवाय त्यानं 10 हजार किलो तांदूळही दान केले होते.

अम्फान वादळात अनेकांचे संसार मोडले गेले. अजूनही अनेक जणं बेपत्ता आहेत. अनेकांवर बेघर होण्याचे संकट ओढावले. त्यांच्या मदतीसाठी गांगुलीनं पुढाकार घेतला आहे.

बीसीसीआयचे अध्यक्ष गांगुलीनं स्वतः याबाबतची माहिती दिली आणि त्याच्या या समाजकार्यात चीनी कंपनी XiaomiIndia यांनीही मदत केली आहे.

गांगुली आणि शाओमी मिळून येथील 10 हजार कुटुंबांच्या खाण्या-पिण्याची सोय करत आहेत.

गांगुलीनं लिहीलं की,''आयुष्यात काही इनिंग्ज नेहमी आपली कसोटी पाहते आणि अथक मेहनत करून अशा परिस्थितीवर मात करता येते. अम्फान वादळानं बंगालला सर्वाधिक फटका पोहोचवला. अशा परिस्थिती सौरव गांगुली फाऊंडेशन आणि शाओमी मिळून 10 हजार कुटुंबीयांची मगत करत आहोत.''