Photo : ना प्रतिस्पर्धींना डिवचणारा जल्लोष, ना उगाचच्या उड्या; जेतेपदानंतरही न्यूझीलंड संघानं जपला साधेपणा!

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : २०१९च्या वन डे वर्ल्ड कप जेतेपदाच्या हुकलेल्या संधीच्या जखमा सोबत घेऊन मैदानावर उतरलेल्या न्यूझीलंड संघानं बुधवारी साऊदॅम्प्टनवर इतिहास रचला.

न्यूझीलंडने आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये टीम इंडियावर ८ विकेट्स राखून विजय मिळवला. पहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या जेतेपदाचा मान न्यूझीलंडनं पटकावला.

१३९ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना केन विलियम्सन व रॉस टेलर ही अनुभवी जोडी मैदानावर तग धरून होती. या दोघांनी भारतीय गोलंदाजांची परिक्षा घेतली आणि ९६ धावांची नाबाद भागीदारी करताना संघाला विजय मिळवून दिला.

रॉस टेलरनं विजयी चौकार मारून जेतेपदावर शिक्कामोर्तब केले, परंतु त्यानंतरही त्यानं प्रतिस्पर्धींना डिवचणारा जल्लोष केला नाही, ना उगाच उड्या मारल्या.

जेतेपद पक्कं झाल्यानंतर टेलर अगदी शांतपणे केनकडे चालत गेला अन् त्याला मिठी मारली. ड्रेसिंग रुममध्ये सहकाऱ्यांनी जल्लोष केला, परंतु त्यांच्या जल्लोषात कुठेच प्रतिस्पर्धी संघाप्रती अनादर दिसला नाही.

याच साधेपणानं न्यूझीलंडनं जागतिक क्रिकेटमध्ये स्वतःचे वेगळेपण जपले आहे.