सलग तीन षटकार लगावणाऱ्या फलंदाजांत कोण आहे टॉप, तुम्हाला माहित्येय?

ट्वेंटी-20 क्रिकेटच्या येण्यानं फलंदाजांच्या फटकेबाजीचे प्रमाणही वाढले. त्यामुळे प्रत्येक फलंदाजाचा कमी चेंडूंत अधिकाधिक धावा करण्यासाठी षटकार खेचणाऱ्यावर अधिक भर असतो. पण, क्रिकेटमध्ये सर्वाधिक सलग तीन षटकार खेचण्याचा पराक्रम कोणाच्या नावावर आहे हे तुम्हाला माहित्येय का?

पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदीनं वन डे क्रिकेटमध्ये 36 चेंडूंत शतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे. या अफलातून खेळीनं तो जगभरातील आक्रमक फलंदाजांच्या पंक्तीत जाऊन बसला.

पण, सलग तीन षटकार खेचण्याच्या शर्यतीत आफ्रिदी पाचव्या क्रमांकावर येतो. त्यानं वन डे क्रिकेटमध्ये दोनवेळा, तर कसोटी व ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये प्रत्येकी एक वेळा सलग तीन षटकार खेचण्याचा पराक्रम केला आहे.

वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज, युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचे नाव या विक्रमात नसते, तर आश्चर्य वाटले असते. जगभरातीय अनेक ट्वेंटी-20 लीगमध्ये गेलची बॅट तळपली आहे.

त्यानं पाचवेळा सलग तीन चेंडूंत तीन षटकार खेचले आहेत. त्यानं वन डे क्रिकेटमध्ये दोन, ट्वेंटी-20त दोन आणि कसोटीत एक वेळा अशी कामगिरी केली आहे.

मिस्टर 360 म्हणून जगभरात ओळख असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सने वन डे क्रिकेटमध्ये 31 चेंडूंत शतक झळकावले आहे.

जेव्हा तीन सलग षटकार खेचण्याचा विचार होतो, तेव्हा एबी तिसऱ्या स्थानावर येतो. त्यानं ट्वेंटी-20त तीनवेळा, वन डे आणि कसोटीत अनुक्रमे दोन व एकवेळा अशी कामगिरी करून दाखवली आहे.

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यानं दुखापतीनंतर स्थानिक ट्वेंटी-20 स्पर्धेतून मैदनावर पुनरागमन केले आहे. आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेतून तो टीम इंडियात पुनरागमन करण्याची शक्यता आहे.

त्यानं सात वेळा सलग तीन षटकार खेचले आहेत. यापैकी वन डे क्रिकेटमध्ये पाच वेळा त्यानं असा पराक्रम केला आहे, तर ट्वेंटी-20 आणि कसोटीत त्याला प्रत्येकी एकदा अशी फटकेबाजी करता आली आहे.

या विक्रमात हिटमॅन रोहित शर्माचे नाव नसते तर आश्चर्य वाटले असते. मागील 5-6 वर्ष सर्वाधिक षटकार खेचण्याचा पराक्रम तोच करत आला आहे.

रोहित शर्मानं तब्बत 8 वेळा सलग तीन षटकार खेचले आहेत. वन डे आणि ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं अनुक्रमे 4 व 3 वेळा अशी आतषबाजी केली, तर कसोटीत केवळ एकदाच त्याला हा पराक्रम करता आला.