MS Dhoni बद्दलच्या 'त्या' एका प्रश्नानं घडवलं सुनील जोशींचं भवितव्य!

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) क्रिकेट सल्लागार समितीने (सीएसी) भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी माजी फिरकीपटू सुनील जोशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

निवड समितीच्या दोन पदांसाठी तीन व्यक्तींच्या बुधवारी मुलाखती घेतल्या गेल्या. यामध्ये माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद, फिरकीपटू सुनील जोशी आणि समालोचक लक्ष्मण शिवरामाकृष्णन यांचा समावेश होता.

तसेच राजेश चौहान व हरविंदर सिंग यांनाही मुलाखतीसाठी बोलाविण्यात आले होते. या सर्वांना क्रिकेट सल्लागार समितीनं माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीबद्दलचा एक प्रश्न विचारला आणि त्यावरून सुनील जोशींचं भवितव्य घडलं.

बुधवारी सकाळी 11 वाजल्यापासून या मुलाखतींना सुरुवात झाली. दोन पदांसाठी तब्बल 44 अर्ज दाखल झाले होते. यामध्ये माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर याचाही समावेश होता.

निवड समितीसाठी त्याला प्रमुख दावेदार मानले जात होते, मात्र त्याला मुलाखतीसाठी बोलाविण्यात आले नाही.

तसेच माजी यष्टीरक्षक नयन मोंगियानेही या पदासाठी अर्ज भरला होता. पण, सल्लागार समितीनं सुनील जोशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. एमएसके प्रसाद यांच्यानंतर आता सुनील जोशी यांच्याकडे टीम इंडियाच्या निवड समितीचे अध्यक्षपद असणार आहे.

निवड समितीमध्ये हरविंदर सिंग यांचाही समावेश करण्यात आला आहे. मदनलाल, आर.पी. सिंह आणि सुलक्षणा नाईक यांच्या समितीने सुनिल जोशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

क्रिकेट सल्लागार समितीनं या सर्व अर्ज कर्त्यांना धोनीच्या भवितव्यबाबत प्रश्न विचारला. ''महेंद्रसिंग धोनीच्या भारतीय संघातील भवितव्याबाबत तुमचा काय निर्णय असेल?,'' अशी गुगली क्रिकेट सल्लागार समितीनं सर्वांसमोर टाकली.

त्यात सुनील जोशींनी स्पष्ट मत व्यक्त करून बाजी मारली. आता त्यांनी नेमकं काय उत्तर दिलं, हे सल्लागार समितीच सांगू शतके. पण, या एका प्रश्नानं सुनील जोशींची लाईफ बनवली हे नक्की.

कर्नाटकचे सुनील जोशी हे टीम इंडियाचे माजी फिरकी गोलंदाज आहेत. त्यांच्याकडे 15 कसोटी आणि 69 वन डे सामन्यांचा अनुभव आहे. 15 कसोटीत त्यांनी 41, तर 69 वन डे सामन्यांत 69 विकेट्स घेतल्या आहेत. या दोन्ही फॉरमॅटमध्ये त्यांच्या नावावर प्रत्येकी एक अर्धशतकही आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 1999 मध्ये त्यांनी 6 धावा देत 5 विकेट्स घेतल्या होत्या आणि ती त्यांच्या कारकिर्दीतली सर्वोत्तम कामगिरी आहे.