Wasim Jaffer : तू टीम इंडियाची नाही, तर स्वतःच्या संघाची इभ्रत काढतोस; वासिम जाफरचे मायकेल वॉनला सडेतोड उत्तर

India vs England, 4th T20I : भारतीय संघानं चौथ्या ट्वेंटी-२० सामन्यात इंग्लंडवर ८ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. Wasim Jaffer Responds to Michael Vaughan

India vs England, 4th T20I : भारतीय संघानं चौथ्या ट्वेंटी-२० सामन्यात इंग्लंडवर ८ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) याच्या अर्धशतकाच्या कामगिरीच्या जोरावर भारतानं ८ बाद १८५ धावांचा डोंगर उभा केला. इंग्लंडला ८ बाद १७७ धावांवर रोखून टीम इंडियानं मालिकेत २-२ अशी बरोबरी मिळवली.

सूर्यकुमार यादवनं ५८ धावांची खेळी केली, तर रिषभ पंत, श्रेयस अय्यर व हार्दिक पांड्या यांनी छोटेखानी खेळी करताना संघाच्य धावसंख्येत योगदान दिले. राहुल चहरननं ३५ धावांत २ आणि हार्दिक पांड्यानं १६ धावांत २ विकेट्स घेतल्या. शार्दूल ठाकूरनं ४२ धावांत ३ विकेट्स घेत सामन्याला कलाटणी दिली.

इंग्लंडला विजयासाठी ६ चेंडूंत २३ धावांची गरज असताना जोफ्रा आर्चर व ख्रिस जॉर्डन हे गोलंदाज खेळपट्टीवर होते. शार्दूल ठाकूरच्या पहिल्या चेंडूवर १ धाव घेत जॉर्डननं आर्चरला स्ट्राईक दिली. त्यानंतर आर्चरनं चौकार व षटकार खेचून सामना ३ चेंडूत १२ धावा असा आणला. त्यानंतर शार्दूलनं सलग दोन चेंडू व्हाईड फेकले आणि इंग्लंडला विजयासाठी ३ चेंडूंत १० धावांची गरज होती. चौथ्या चेंडूवर १ धाव घेतल्यानं जॉर्डन स्ट्राईकवर गेला. पाचव्या चेंडूवर जॉर्डनला बाद करण्यात शार्दूलला यश आलं. त्यानंतर अखेरच्या चेंडूवर एकच धाव देत शार्दूलनं सामना जिंकून दिला.

या सामन्यानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन ( Michael Vaughan) यानं भारतीय संघाचे कौतुक करताना केलेल्या खोचक ट्विटला भारताचा माजी सलामीवीर वासिम जाफर ( Wasim Jaffer) यानं सडेतोड उत्तर दिलं. आता यापुढे वॉन टीम इंडियाच्या वाट्याला जाईल असे वाटत नाही.

वॉननं ट्विट केलं की,''भारतीय संघाच्या विजयात मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचा मोठा वाटा आहे. असंच मला सूचलं, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या हे मुंबई इंडियन्सचे खेळाडू. रोहित शर्मा हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार.''

जाफरनं त्याला उत्तर दिले की,''तुमचा संघ राष्ट्रीय संघाकडून नव्हे, तर फ्रँचायझी संघाकडून पराभूत झाला, असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा तुम्ही प्रतिस्पर्धींना नव्हे, तर स्वतःच्याच संघाला ट्रोल करता. शुभरात्री.''

यापूर्वीही टीम इंडियापेक्षा मुंबई इंडियन्सचा संघ चांगला असं ट्विट वॉननं केलं होतं. शिवाय त्यानं अखेरच्या षटकांत रोहित शर्माला नेतृत्व सांभाळण्यासाठी दिलं, यावरूनही विराटचे कौतुक केलं होतं.