विराट कोहली RCBची साथ सोडणार? टीम इंडियाच्या कर्णधाराचं मोठं विधान

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( आयपीएल ) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाचे नेतृत्व करतो. आयपीएलमध्ये इतकी वर्ष एकाच संघाकडून खेळणारा कोहली हा एकमेव खेळाडू आहे.

पण, RCBसोबतच्या भविष्याबाबत कोहलीनं शुक्रवारी मोठं विधान केलं. कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांच्यात झालेल्या इंस्टाग्राम लाईव्ह चॅटमध्ये टीम इंडियाच्या कर्णधारानं एक मोठी घोषणा केली.

2008मध्ये RCB संघानं 30 हजार डॉलरमध्ये कोहलीला आपल्या ताफ्यात घेतले. याच वर्षी कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताच्या 19 वर्षांखालील संघानं वर्ल्ड कप उंचावला होता.

त्यानंतर कोहली RCBच्या ताफ्यात दाखल झाला. तेव्हा RCB संघात राहुल द्रविड, अनिल कुंबळे आणि झहीर खान हे दिग्गज खेळाडू होते.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली युवा कोहली बरंच काही शिकला. पहिल्या दोन मोसमात कोहलीला छाप पाडता आली नाही आणि त्याला अनुक्रमे 165 व 246 धावाच करता आल्या. पण, 2010च्या मोसमात त्यानं 300हून अधिक धावा केल्या आणि त्यानंतर त्यानं मागे वळून पाहिले नाही.

2013च्या मोसमात RCBचं नेतृत्व कोहलीकडे सोपवण्यात आले आणि ते आतापर्यं कायम आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली RCBला एकही जेतेपद पटकावता आले नसले तरी 2016मध्ये RCBनं अंतिम फेरीत प्रवेश केला होता. 2016च्या मोसमात जेतेपदाच्या सामन्यात सनराझर्स हैदराबाद संघानं त्यांना पराभूत केले होते.

कोहलीनं या फ्रँचायझीसोबतच्या भविष्याच्या वाटचालीबद्दल मोठी घोषणा केली. तो म्हणाला,''12 वर्ष या संघासोबतचा माझा प्रवास अविश्वसनीय आहे. एबी तूही 9 वर्ष RCBसोबत आहेस. तीन वेळा आपण जेतेपदाच्या जवळ आलो, परंतु यश मिळाले नाही.''

''जेतेपदाचे स्वप्न आपण सर्वांनी मिळून पाहिले आहे. हे स्वप्न आजही कायम आहे आणि हा संघ सोडण्याचा विचारही माझ्या मनात नाही. या फ्रँचायझीकडून मिळणारं प्रेम, माया मला तसं करण्याची परवानगी देत नाही. मी जोपर्यंत आयपीएल खेळत आहे, तोपर्यंत मी या संघासोबतच कायम राहणार,'' हे कोहलीनं स्पष्ट केलं.

RCBनं सुरुवातीला कोहलीसाठी 30 हजार डॉलर मोजले असले तरी सध्या आयपीएलमध्ये सर्वाधिक पगार घेणारा खेळाडू आहे. त्याला 17 कोटी रुपये मिळतात. कोहीलनं आयपीएलच्या 177 सामन्यांत 5412 धावा केल्या आहेत.