विराट कोहलीनं ट्वेंटी-20 मालिका विजयानंतर नोंदवले अनेक विक्रम; जे MS Dhoniलाही जमले नाहीत!

भारतीय संघानं रविवारी दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात ६ विकेट्स राखून विजय मिळवताना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. भारतानं सलग १०वा ट्वेंटी-20 सामन्यांत विजयी मालिका कायम राखली आहे. डिसेंबर २०१९ पासून टीम इंडियानं ट्वेंटी-20 सामन्यात वर्चस्व गाजवले आहे.

ऑस्ट्रेलियाच्या ४ बाद १९४ धावांच्या प्रत्युत्तरात लोकेश राहुल ( ३०) आणि धवन ( ५२) यांनी टीम इंडियाला सॉलिड सुरुवात करून दिली. राहुल व धवन यांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. संजू सॅमसन ( १५) पुन्हा अपयशी ठरला.

विजयासाठी ४६ धावांची गरज असताना डॅनिएल सॅम्सनं ऑसींना मोठी विकेट मिळवून दिली. विराट २४ चेंडूंत २ चौकार व २ षटकारासह ४० धावांत माघारी परतला. हार्दिक व श्रेयस अय्यरनं अखेरच्या षटकात फटकेबाजी करून सामन्यासह मालिकाही खिशात घातली. हार्दिक २२ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ४२ धावांवर, तर अय्यर ५ चेंडूंत १२ धावांवर नाबाद राहिला. भारतानं ६ विकेट्स राखून हा सामना जिंकला.

या सामन्यात कर्णधार विराट कोहलीनं ( Virat Kohli) नावावर अनेक विक्रम नोंदवले. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया ( SENA countries) या देशांमध्ये ट्वेंटी-20 मालिका जिंकणारा तो पहिला भारतीय कर्णधार धरला.

महेंद्रसिंग धोनीनं दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियात हा पराक्रम केला होता, परंतु त्याला इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये कर्णधार म्हणून हे यश मिळवता आले नाही.

विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं २०१८मध्ये दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड येथे ट्वेंटी-20 मालिका जिंकली होती. या वर्षाच्या सुरूवातीला न्यूझीलंमध्ये ५-० असा आणि आता ऑस्ट्रेलियात २-० असा विजय मिळवला.

त्याशिवाय ऑस्ट्रेलियात तीनही फॉरमॅटमधील मालिका जिंकणारा विराट कोहली हा दक्षिण आफ्रिकेच्या फॅफ ड्यू प्लेसिसनंतर दुसरा कर्णधार ठरला. विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं २०१८-१९ च्या दौऱ्यावर वन डे व कसोटी मालिका जिंकली होती.

श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया या तीनही देशांमध्ये तीनही फॉरमॅटच्या मालिका जिंकणारा विराट कोहली हा जगातील पहिला कर्णधार आहे.

भारताचा हा सलग सहावा ट्वेंटी-20 मालिका विजय आहे. पाच वेगवेगळ्या देशांना सलग ट्वेंटी-20 मालिकेत पराभूत करणारा भारत हा पहिलाच देश आहे.

शिवाय ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये ट्वेंटी-20 मालिका जिंकणारा विराट कोहली हा पहिलाच भारतीय कर्णधार आहे.

भारताची मागील सात ट्वेंटी-२० मालिकेतील अपराजीत कामगिरी - वेस्ट इंडिज ( वि. ३-०), दक्षिण आफ्रिका ( बरोबरीत १-१), बांगलादेश ( वि. २-१), वेस्ट इंडिज ( वि. २-१), श्रीलंका ( वि. २-०), न्यूझीलंड ( वि. ५-०), ऑस्ट्रेलिया ( वि. २-०).