विराट कोहलीशी संवाद साधणे खेळाडूंना जायचे अवघड; समोर आलं धक्कादायक कारण

विराट कोहलीनं ( Virat Kohli) वर्ल्ड कप स्पर्धेनंतर टीम इंडियाच्या ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व सोडण्याची घोषणा केली अन् ड्रेसिंग रूममधील एकेक गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत

विराट कोहलीनं ( Virat Kohli) वर्ल्ड कप स्पर्धेनंतर टीम इंडियाच्या ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व सोडण्याची घोषणा केली अन् ड्रेसिंग रूममधील एकेक गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. संघातील काही खेळाडूंना विराटची वागणूक नाही आवडायची आणि ते त्याच्याशी सहमत नसायचे. सीनियर खेळाडूंसह ज्युनियर खेळाडूंच्या मनातही विराट प्रति विश्वासाची भावना नव्हती. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर या गोष्टी झपाट्यानं बदलल्या.

एडिलेड कसोटीत भारतीय संघ ३६ धावांवर गडगडला आणि त्यानंतर पहिल्या मुलाच्या जन्मासाठी विराट मायदेशात परतला. त्याची पितृत्व रजा पहिल्यापासून ठरली होती, परंतु त्याच्या शिवायही संघातील युवा खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आणि मालिका २-१ अशी जिंकली. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली. एखादा खेळाडू आऊट ऑफ फॉर्म असल्यास विराट त्याची साथ सोडून द्यायचा, अशीही तक्रार काही खेळाडूंनी केली आहे.

कठीण प्रसंगी विराट ज्युनियर खेळाडूंची साथ सोडून द्यायचा, ही मोठी तक्रार आहे. एका क्रिकेटपटूनं PTI ला सांगितले की,''ऑस्ट्रेलियात पाच विकेट घेतल्यानंतरही कुलदीप यादवला संघाबाहेर केले गेले. जेव्हा रिषभ पंत फॉर्मात नव्हता, त्याच्यासोबतही असेच केले गेले. भारतीय खेळपट्टीवर दमदार कामगिरी करणाऱ्या उमेश यादवला त्याच्या नावाच विचार का होत नाही, याचं उत्तर कधीच मिळालं नाही.''

सध्या संघाबाहेर असलेल्या एका क्रिकेटपटूनं PTI ला सांगितले की, तो मीडियासमोर कम्युनिकेशबाबत बोतलो, परंतु खरं तर तो एखाद्या खेळाडूला गरज असताना क्वचितच आधार देतो. ''

'भाषा' या न्यूज एजंसीनं दिलेल्या वृत्तानुसार विराटच्या या निर्णयामागे एक मोठं कारण आहे. एजंसीनं सांगितलं की,''विराटसोबत संवादाची समस्या आहे. महेंद्रसिंग धोनीच्या खोलीचा दरवाजा २४ तास उघडा असायचा. त्याच्याकडे खेळाडू कधीही संवाद साधायला जाऊ शकत होते. त्याच्यासोबत व्हिडीओ गेमही खेळायचे आणि क्रिकेटवर चर्चाही करायचे. पण, मैदानाबाहेर विराटची संपर्क साधणे खूपच अवघड होत होते.''