दशकविराट!!! सरत्या दशकावर कोहलीची छाप; नोंदवले हे मोठे विक्रम

2010 ते 2019 या सरत्या दशकामध्ये भारतीय क्रिकेट संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जबरदस्त छाप पाडली आहे. त्याबरोबरच भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज विराट कोहली यानेही गेली दहा वर्षे आपला दबदबा राखला आहे. या कामगिरीच्या जोरावर विराट गेल्या दहा वर्षातील सर्वोत्तम फलंदाज ठरला आहे. घेऊया विराटच्या कामगिरीचा आढावा.

2010 ते 2019 या दहा वर्षांच्या काळात विराट कोहली हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज ठरला आहे. त्याने या दहा वर्षांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 20 हजार 960 धावा फटकावल्या आहेत.

विराट कोहलीने आपल्या फलंदाजीचा दबदबा निर्माण करताना 10 वर्षांत 69 शतके फटकावली आहेत.

गेल्या दहा वर्षांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतके फटकावण्याचा विक्रमही विराट कोहलीच्याच नावावर आहे.

गेल्या 10 वर्षांत विराट कोहलीने एक फलंदाज म्हणून कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेंटी-20 क्रिकेटचे मैदान गाजवले आहे. तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर 50 हून अधिकची सरासरी असणारा आजच्या घडीचा विराट हा एकमेव फलंदाज आहे. तसेच गेल्या 10 वर्षांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराटची सरासरी 57.58 इतकी राहिली आहे.

गेल्या 10 वर्षात विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 55 सामनावीर आणि 15 मालिकावीर पुरस्कार पटकावले आहेत.

आयसीसीकडून आयोजित होणाऱ्या विश्वचषक, ट्वेंटी-20 विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धांमध्येही विराटने आपला दबदबा राखला आहे.

गेल्या 10 वर्षांत झालेल्या आयसीसीच्या स्पर्धांमध्ये मिळून विराटने 2241 धावा फटकावल्या आहेत. तसेच त्याची सरासरी ही 62.25 एवढी राहिली आहे. या धावा आणि सरासरी इतरांपेक्षा अधिक आहे.