विराट कोहलीचा विक्रम, रैनालाही टाकलं मागे

सलग सहा सामन्यांतील पराभवाची मालिका खंडीत करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने शनिवारी आयपीएलच्या 12व्या मोसमात पहिल्या विजयाची चव चाखली. किंग्स इलेव्हन पंजाबने प्रथम फलंदाजी करताना ख्रिस गेलच्या नाबाद 99 धावांच्या जोरावर 173 धावा केल्या होत्या.

विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांच्या अर्धशतकांच्या जोरावर बंगळुरूने आठ विकेट्स राखत हा सामना जिंकला. डी' व्हिलियर्सने 38 चेंडूंत नाबाद 59 धावांची खेळी साकारत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार कोहलीने या सामन्यात 67 धावांची खेळी करताना ट्वेंटी-20 मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा भारतीय खेळाडूचा विक्रम नावावर केला. त्याने चेन्नई सुपर किंग्सच्या सुरेश रैनाला मागे टाकले.

245 ट्वेंटी-20 सामन्यांत कोहलीनं 41.22 च्या सरासरीने 8175 धावा केल्या आहेत. त्यात चार शतकांचा, तर 59 अर्धशतकांचा समावेश आहे.

यापैकी कोहलीने 62 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 2263 धावा केल्या आहेत आणि त्यात 20 अर्धशतकांचा समावेश आहे. उर्वरित 5218 धाव या त्याने आयपीएलमधील 162 सामन्यांत केल्या आहेत. सुरेश रैनाच्या नावावर 293 ट्वेंटी-20 सामन्यांत 8145 धावा होत्या.

ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये ख्रिस गेल ( 12640) अव्वल स्थानावर आहे. त्याने 370 डावांत 38.94च्या सरासरीने या धावा चोपल्या आहेत. त्यापाठोपाठ ब्रेंडन मॅकलम ( 9922), किरॉन पोलार्ड ( 9216), शोएब मलिक ( 8701) आणि डेव्हिड वॉर्नर ( 8460) यांचा क्रमांक येतो.

भारतीय खेळाडूंमध्ये कोहली व रैनापाठोपाठ रोहित शर्मा 7960 ( 292 डाव) तिसऱ्या स्थानावर आहे.