भारतीय क्रिकेटसाठी खास योगायोग, टीम इंडियातील जडेजा, बुमरासह या पाच दिग्गजांचा आज एकाच दिवशी वाढदिवस

Team India: या पाच क्रिकेटपटूंमध्ये रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja), जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumra), श्रेयस अय्यर (Shreyas Iyer), करुण नायर (Karun Nair) आणि आर.पी. सिंह (R.P. Singh) यांचा समावेश आहे.

आज सहा डिसेंबर. आजचा दिवस भारतीय क्रिकेट संघासाठी खास योगायोग असलेला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या धडाकेबाज खेळाने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या पाच क्रिकेटपटूंचा आज वाढदिवस आहे. त्यापैकी तिघे सध्या भारतीय संघात आहेत. तर एक बऱ्याच दिवसांपासून संघाबाहेर आहे. तर एकजण निवृत्त झाला आहे.

या पाच क्रिकेटपटूंमध्ये रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर, करुण नायर आणि आर.पी. सिंह यांचा समावेश आहे.

भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजाचा आज वाढदिवस आहे. ६ डिसेंबर १९८८ रोजी जन्मलेल्या रवींद्र जडेजाने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात २००९ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत १६८ वनडे, ५७ कसोटी आणि ५५ टी-२० सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आज २८ वर्षांचा झाला. ६ डिसेंबर १९९३ रोजी जन्मलेला जसप्रीत बुमराह क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये भारतीय संघाचा आधारस्तंभ आहे. आतापर्यंत जसप्रीत बुमराहने ६७ वनडे, ५५ टी-२० आणि २४ कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

नुकतेच कसोटी क्रिकेटमधील पदार्पण गाजवणारा मुंबईकर श्रेयस अय्यर आज २७ वर्षांचा झाला आहे. एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय संघाच्या प्रमुख फलंदाजांपैकी एक बनलेल्या श्रेयस अय्यरने न्यूझीलंडविरुद्धच्या कानपूर कसोटीतून दमदा पदार्पण करताना शतकी खेळी केली होती. तसेच त्याने आतापर्यंत २२ एकदिवसीय आणि ३२ टी-२० सामने खेळले आहेत.

वीरेंद्र सेहवागनंतर भारताचा दुसरा त्रिशतकवीर ठरलेला करुण नायर आज ३० वर्षांचा झाला आहे. करुणने त्याच्या तिसऱ्या कसोटी सामन्यामध्येच धडाकेबाज त्रिशतकी खेळी केली होती. मात्र २०१७ नंतर त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळालेली नाही. त्याने ६ कसोटी आणि २ एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

भारताच्या माजी वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या आर.पी. सिंह याचा आज ३६ वा वाढदिवस आहे. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या फैसलाबाद कसोटीमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्या सामन्यात तो सामनावीर ठरला होता. तसेच २००७ च्या विश्वचषकातील भारताच्या विजयातही त्याची भूमिका मोलाची होती. आरपीने १४ कसोटी, ५८ वनडे आणि १० टी-२० सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

Read in English