Temba Bavuma: टेम्बा बवुमानं इयत्ता ६ वीतच पाहिलेलं द.आफ्रिकेला सर्वोत्तम संघ बनवण्याचं स्वप्नं!

Temba Bavuma, South Africa: द.आफ्रिकेनं भारतीय संघाचा कसोटीपाठोपाठ वनडे मालिकेतही पराभव करुन जोरदार धक्का दिला. यात आफ्रिकेचा युवा फलंदाज टेम्बा बवुमानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. टेम्बा बवुमाची आजवरची संघर्ष कहाणी देखील खूप प्रेरणादायी आहे...

वर्ष होतं २००१ आणि शहर द.आफ्रिकेतील केप टाऊन. इयत्ता सहावीत शिकणाऱ्या एका मुलाला शाळेतून प्रोजेक्ट दिला गेला होता. त्याचा विषय होता की तुम्ही स्वत:ला पुढील १५ वर्षांनंतर कुठे पाहाता?

त्या ११ वर्षीय मुलानं उत्तरात जे लिहिलं त्यानंतर त्याचं नाव शाळेच्या मासिकात गर्वानं छापण्यात आलं. तोच मुलगा आज जागतिक क्रिकेटचा युवा क्रिकेटपटू तर आहेच पण एका संघाचा कर्णधार आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार टेम्बा बवुमाची ही कहाणी आहे. कसोटीनंतर वनडे मालिकेतही भारतीय संघाला धुळ चारल्याच्या कामगिरीत द.आफ्रिकेचं सांघिक योगदान तर आहेच. पण टेम्बा बवुमाचा यात सिंहाचा वाटा राहिला आहे.

टेम्बा बवुमानं तो इयत्ता सहावीत असताना लिहिलेल्या निबंधात नेमकं काय लिहिलं होतं ते आधी आपण जाणून घेऊयात. त्यावरुच या खेळाडूचं व्हिजन आणि मानसिकता लक्षात येईल. टेम्बा बवुमानं निबंधात देशाच्या राष्ट्रपतींचं नाव लिहिलं होतं.

"पुढील १५ वर्षांनंतर मी स्वत:ला राष्ट्रपती मिस्टर माबेकी यांच्यासोबत हस्तांदोलन करत असताना पाहातो. जे मला द.आफ्रिकेचा आदर्श क्रिकेट संघ तयार केल्याबद्दल सन्माननं अभिनंदन करत आहेत", असं टेम्बानं इयत्ता ६ वीत असताना निबंधात लिहिलं होतं.

"मी जर असं करू शकलो तर तो माझे प्रशिक्षक, आई-वडील आणि विशेषत: माझ्या काकांचा खूप आभारी असेन", असंही त्यानं नमूद केलं होतं.

विशेष म्हणजे त्यावेळी टेम्बाच्या या विधानांना आणि स्वप्नाला कुणीच गांभीर्यानं घेतलं नव्हतं. २०१६ सालापर्यंत द.आफ्रिकेसाठी त्यानं कसोटीत आपलं पहिलंवहिलं शतक साजरं केलं आणि सर्वांना आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यास भाग पाडलं. अशी शतकी कामगिरी करणारा टेम्बा द.आफ्रिकेचा पहिला कृष्णवर्णीय फलंदाज ठरला होता. त्यानंतर टेम्बा आता द.आफ्रिकेचा पहिलावहिला कृष्णवर्णीय कर्णधार देखील बनला आहे.

टेम्बा बवुमानं आजवर केवळ १६ आंतरराष्ट्रीय वनडे सामने खेळले आहेत. पण कसोटीत त्यानं ४७ सामन्यांमध्ये देशाचं प्रतिनिधित्व केलं आहे. नुकतंच भारतीय संघाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत बवुमानं मोठ्या खुबीनं कर्णधारी कामगिरी बजावली.

बवुमानं केवळ फलंदाजीच नव्हे, संघाचा कर्णधार म्हणूनही एक वेगळी छाप सोडली आहे. "टेम्बा एक उत्तम नेतृत्त्वगुण असलेला खेळाडू असून तो एक माणूस म्हणूनही खूप चांगला आहे. संघात त्यानं चांगलं वातावरण निर्माण केलं आहे", असं द.आफ्रिकेच्या संघाचे मीडिया व्यवस्थापक सिपोकाजी यांनी सांगितलं.