चौथ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज; 'या' खेळाडूंना Playing XI मध्ये मिळू शकते संधी

जखमांनी त्रस्त असलेल्या भारतीय संघाने बुधवारी गाबा मैदानावर पहिल्या सत्रात कसून सराव केला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध उद्या, शुक्रवारी सुरू होत असलेल्या चौथ्या तसेच निर्णायक कसोटीत बाजी मारण्यासाठी फिट एकादश उतरविण्याच्या अपेक्षेने सर्व खेळाडू घाम गाळताना दिसले.

सिडनीत तिसऱ्या कसोटीदरम्यान पोटाचे स्नायू दुखावल्याने चौथ्या सामन्यात खेळू न शकणारा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा देखील सरावाच्या वेळी संघासोबत होता. बुमराहने गोलंदाजी कोच भारत अरुण यांच्यासोबत सखोल चर्चा केली. रोहित शर्मा, शुभमान गिल, कर्णधार अजिंक्य रहाणे आणि अन्य खेळाडू सरावाच्या इराद्याने आले होते.

दुखापतग्रस्त खेळाडू हा टीम इंडियासाठी सध्या चिंतेचा विषय ठरत आहे. आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे, चौथ्या कसोटी सामन्यासाठी संघात कोण-कोणत्या खेळाडूंना स्थान मिळणार, असा उपस्थित होऊ लागला आहे.

मोहम्मद शमी, उमेश यादव, रवींद्र जाडेजा, हनुमा विहारी, ऋषभ पंत, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, मयंक अग्रवाल आणि रविचंद्रन अश्विन हे खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आतापर्यंत दुखापतग्रस्त झाले आहेत. तसेच सीरिजपूर्वी देखील काही खेळाडू दुखापतीचा सामना करत होता. त्यामध्ये इशांत शर्मा आणि भुवनेश्वर कुमार यांचा समावेश होतो.

चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादव याने नेटमध्ये बराचवेळ गोलंदाजीचा सराव केला. अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे कुलदीपला संघात स्थान मिळण्याची शक्यता बळावली आहे.

तसेच वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर आणि अष्टपैलू वाशिंगटन सुंदरही प्रॅक्टिस सेशनमध्ये सहभागी झाला होता. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंना चौथ्या कसोटी सामन्यात खेळण्याची संधी दिली जाऊ शकते. बुमराहच्या जागी टी नटराजन किंवा शार्दुल ठाकूर खेळताना दिसू शकतो. तसेच शेवटच्या कसोटी सामन्यात हनुमा विहारी ऐवजी वॉशिंगटन सुंदरला संधी मिळू शकते.

दरम्यान, ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-1 अशी बरोबरी साधली आहे. चौथा कसोटी सामना जिंकणारा संघ मालिका आपल्या नावे करणार आहे. टीम इंडियाने ज्याप्रकारे तिसरा कसोटी समाना ड्रॉ केला होता.

त्यामुळे संघाचा आत्मविश्वास नक्कीच वाढला आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडू ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायदेशात पराभूत करत मालिका खिशात घालण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करताना दिसेल, याच काहीच शंका नाही.