टीम इंडियाची वर्षातील अखेरची कसोटी; गोलंदाजांनी मोडले अनेक विक्रम

भारतीय संघानं सलग चार सामन्यांत डावानं विजय मिळवण्याचा विश्वविक्रम नोंदवला. त्यांनी दक्षिण आफ्रिका आणि आता बांगलादेश यांच्यावर डावानं विजय मिळवले. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा हा पहिलाच संघ ठरला.

भारतानं सलग सात कसोटी सामने जिंकले. यापूर्वी 2013मध्ये टीम इंडियानं महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली सलग सहा कसोटी सामने जिंकले होते. त्यापैकी चार सामने ऑस्ट्रेलिया आणि दोन वेस्ट इंडिजविरुद्धचे विजय होते.

बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारताच्या जलदगती गोलंदाजांनी 19 विकेट्स घेतल्या. घरच्या मैदानावर एका कसोटीत जलदगती गोलंदाजांनी केलेली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. यापूर्वी 2017मध्ये इडन गार्डनवर श्रीलंकेविरुद्ध भारताच्या जलदगती गोलंदाजांनी 17 विकेट्स घेतल्या होत्या. मागील दोन वर्षांत भारताच्या जलदगती गोलंदाजांनी तिसऱ्यांदा 19 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेत्लया.

इडन कसोटीत भारताच्या फिरकीपटूला एकही विकेट घेता आलेली नाही. घरच्या मैदानावर असे प्रथमच झाले की जलदगती गोलंदाजांच्या जोरावर भारतानं कसोटी सामना जिंकला. यात इशांत शर्मानं 9, उमेश यादवनं 8 आणि मोहम्मद शमीनं दोन विकेट्स घेतल्या.

एकाच कसोटीत भारताच्या दोन जलदगती गोलंदाजांनी आठ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. इशांत आणि उमेश यांनी आज इतिहास घडवला. 2010-11च्या पर्थ येथे झालेल्या अॅशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या रायन हॅरीस आणि मिचेल जॉन्सन यांनी अशी कामगिरी केली होती.

2019च्या वर्षात भारताच्या जलदगती गोलंदाजांनी 15.16 च्या सरासरीनं गोलंदाजी केली आहे. कॅलेंडर वर्षात 50+ विकेट्स घेऊन नोंदवलेली ही दुसरी सर्वोत्तम गोलंदाजी ठरली.

भारताच्या तीन जलदगती गोलंदाजांनी 20+ विकेट्स घेतल्या आणि तेही 20च्या आतील सरासरीनं. या तीन गोलंदाजांत उमेश, इशांत आणि शमी यांचा समावेश आहे. यापूर्वी 1978मध्ये इयान बॉथम, ख्रिस ओल्ड आणि बॉब विलीस यांनी अशी कामगिरी केली होती.