T20 WC team selection: टीम इंडियाचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठीचा संघ ठरला, विराट कोहली व रवी शास्त्री यांच्याशी होणार अंतिम चर्चा!

यूएईत होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या भारतीय संघात कोणाला कोणाला संधी मिळतेय याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मंगळवारी पाकिस्तान संघानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठीचा संघ जाहीर केला अन् आता प्रतिक्षा टीम इंडियाच्या घोषणेची आहे.

टीम इंडियाच्या निवड समिती मंगळवारी कर्णधार विराट कोहली व मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे चर्चा करून ट्वेंटी-२० वर्ल्ड कप साठीचा संघ निश्चित करणार आहे, परंतु दोन खेळाडूंच्या निवडीवरून ही घोषणा लांबली आहे. या बैठकीत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली व सचिव जय शाह हेही उपस्थित असणार आहेत.

विराट कोहली व रवी शास्त्री यांच्याशी चर्चा करून अंतिम संघ जाहीर करण्यात येईल. टीम इंडिया वर्ल्ड कपसाठी १८ ते २० सदस्यीय संघ जाहीर करणार आहे. कोरोना नियमांमुळे आयसीसीनं खेळाडूंची संख्या २३ वरून ३० इतकी नेण्यास मान्यता दिली आहे. यात सपोर्ट स्टाफचाही समावेश असणार आहे.

संघ ३० पेक्षा अधिक जणांचा ताफा घेऊन जाऊ शकतो, परंतु त्याचा खर्च त्या त्या क्रिकेट संघटनेला करावा लागणार आहे. भारताच्या संघात युझवेंद्र चहल व रवींद्र जडेजा या दोन फिरकीपटूंचे स्थान पक्के मानले जात आहे. वरूण चक्रवर्थी व राहुल चहर यांच्यापैकी राखीव फिरकीपटू म्हणून कोणाला संधी द्यायची यावर चर्चा सुरू आहे.

रिषभ पंत व लोकेश राहुल हे दोघंही यष्टिंमागे व फलंदाजीत कमाल दाखवण्यात सक्षम आहेत. तरीही राखीव यष्टिरक्षक फलंदाज म्हणून इशान किशन व संजू सॅमसन यांच्यात चुरस आहे. श्रीलंका दौऱ्यावर संजूला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. हार्दीक पांड्या गोलंदाजी करायला लागला आहे, परंतु शार्दूल ठाकूरनं त्याच्यासमोर तगडं आव्हान उभं केलं आहे.

श्रेयस अय्यर दुखापतीतून सावरला असला तरी त्याचे वर्ल्ड कप खेळणे अवघड आहे, अशात सूर्यकुमार यादवला संधी दिली जाऊ शकते. अतिरिक्त सलामीवीर म्हणून रोहित शर्मा व राहुल यांच्यासह शिखर धवनचा विचार केला जाऊ शकतो, परंतु या सर्व गोष्टींचा विचार केल्यास भारताच्या खेळाडूंची संख्या २० पर्यंत जाईल.

जलदगती गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी यांची निवड पक्की आहे. दीपक चहर व मोहम्मद सिराज हे शर्यतीत आहेत. पृथ्वी शॉ, चेतन सकारिया, अक्षर पटेल, कृणाल पांड्या व टी नटराजन यांचीही नावं चर्चेत आहेत.

असा असेल भारतीय संघ - विराट कोहली, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, दीपक चहर, मोहम्मद शमी, शार्दूल ठाकूर.