T20 World Cup 2021: टीम इंडिया ट्वेन्टी-२० वर्ल्डकप कसा जिंकणार? गांगुलीनं सांगितला 'मास्टर प्लान', दिला मोलाचा सल्ला; वाचा...

T20 World Cup 2021: बीसीसीआयचे अध्यक्ष आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यानं भारतीय संघ ट्वेन्टी-२० वर्ल्डकप विजयाचा प्रबळ दावेदार असल्याचं म्हटलं आहे. ट्वेन्टी-२० वर्ल्डकप जिंकण्यासाठी भारताची नेमकी रणनिती काय असणार आहे? याबाबत गांगुलीनं मोठा खुलासा केला आहे.

यूएई आणि ओमानमध्ये ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेला येत्या १७ ऑक्टोबर पासून सुरूवात होत आहे. भारतीय संघाचा पहिलाच सामना २४ ऑक्टोबर रोजी पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी होणार आहे. भारतीय संघाला वर्ल्डकप जिंकण्यासाठी नेमकं काय करावं लागणार आहे याची माहिती गांगुलीनं दिली आहे.

"तुम्ही अगदी सहजपणे चॅम्पियन होत नसता किंवा तुम्ही स्पर्धेत केवळ प्रवेश मिळवला आहे म्हणूनही तुम्ही चॅम्पियन ठरत नाही. त्यासाठी तुम्हाला एका प्रक्रियेतून जावं लागतं आणि भारतीय संघाला फक्त खेळातील परिपक्वता दाखवून द्यायची आहे", असं गांगुली म्हणाला.

"भारतीय संघात प्रचंड क्षमता आहे. इतक्या मोठ्या व्यासपीठावर खेळताना धावा करणं आणि विकेट्स घेण्यासाठी उत्तम खेळाडू संघात उपलब्ध आहेत. भारतीय संघाला वर्ल्डकप जिंकण्यासाठी फक्त मजबूत मानसिकतेनं उतरण्याची गरज आहे. मानसिक पातळीवर संघ मजबूत राहिला पाहिजे", असंही गांगुलीनं सांगितलं.

थेट वर्ल्डकप विजयाकडे लक्ष केंद्रीय करण्यापेक्षा प्रत्येक सामन्यात विजय कसा प्राप्त करता येईल यावर जास्त लक्ष केंद्रीत केलं तर स्पर्धेला सामोरं जाणं संघासाठी आणखी सोपं ठरेल. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच थेट वर्ल्डकप विजयाचा विचार करु नये, असा सल्ला गांगुलीनं दिला आहे.

भारतीय संघ ज्या ज्या आयसीसी स्पर्धांमध्ये सहभाग घेतो. त्या सर्व स्पर्धांमध्ये भारत प्रत्येकवेळी विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असतो. भारतीय संघासमोर शांत खेळ करणं हेच मोठं आव्हान असणार आहे. निकालापेक्षा प्रक्रियेवर लक्ष देण्याची गरज आहे. कारण सर्वात कठीण आणि चुकीची गोष्ट तिच असते जेव्हा तुम्ही वर्ल्डकप जिंकण्यासाठी आपण इथं आलो आहोत याची काळजी करू लागता. त्यानं तुमच्या खेळावर मानसिक बंधन येतात , असं मत गांगुलीनं व्यक्त केलं.

आयपीएलमधील सामन्यांमध्ये संघांना मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही. याबाबत विचारण्यात आलं असता गांगुलीनं वर्ल्डकपमध्ये आयपीएलसारखंच चित्र असेल असं वाटत नाही, असं मत व्यक्त केलं.

शारजामध्ये कदाचित खेळपट्टीमुळे कमी धावसंख्येचे सामना पाहायला मिळू शकतात. पण दुबईत असं होणार नाही. जिथं काल आयपीएलचा अंतिम सामना खेळविण्यात आला. या खेळपट्टीवर धावा होताना दिसू शकतात, असं गांगुली म्हणाला.

अबुधाबी देखील फलंदाजीसाठी पोषक ठरेल असा विश्वास असल्याचंही गांगुलीनं म्हटलं. अर्थात गोलंदाजांवरही आपला प्रत्येक चेंडू अचूकतेनं टाकण्यासाठीच्या उद्देशानं प्रयत्न करत राहणं गरजेचं असल्याचंही गांगुली म्हणाला. गोलंदाजांनी स्पर्धेच्या निकालापेक्षा आपल्या चार षटकांमधील प्रत्येक चेंडूवर अधिक लक्ष केंद्रीत करावं, असा सल्ला गांगुलीनं दिला आहे.