सुरेश रैनाचे दोन मोठे विक्रम IPL 2020मध्ये रोहित शर्मा अन् विराट कोहली मोडणार!

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League) 13व्या पर्वात सुरेश रैना ( Suresh Raina), हरभजन सिंग ( Harbhajan Singh) या भारतीय खेळाडूंसह लसिथ मलिंगा, ख्रिस वोक्स, जेसन रॉय, केन रिचर्डसन, हॅरी गर्नीन यांचाही खेळ यंदाच्या IPL 2020मध्ये पाहायला मिळणार नाही. पण, यापैकी सुरेश रैनाची फटकेबाजी सर्वाधिक मिस केली जाणार आहे.

चेन्नई सुपर किंग्सचा ( Chennai Super Kings) उपकर्णधार रैना हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. IPL 2020मधील त्याची अनुपस्थिती CSKला किती महागात पडते, हे येणारा काळच सांगेल.

पण, रैनाचे दोन मोठे विक्रम यंदाच्या आयपीएलमध्ये रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि विराट कोहली ( Virat Kohli) यांच्याकडून मोडले जाण्याची शक्यता आहे.

सुरेश रैनानं वैयक्तिक कारणास्तव IPL 2020मधून माघार घेतली. त्याच्या माघारीमागचं नेमकं कारण, अजूनही स्पष्ट झालेलं नाही.

कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जेव्हा निवृत्ती जाहीर केली, त्याच दिवशी रैनानंही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला. त्यामुळे ही दोघं IPL 2020त तुफान फटकेबाजी करतील अशी सर्वांना खात्री होती.

पण, रैनानं माघार घेत सर्वांना धक्का दिला. रैनानं 18 कसोटीत 768 धावा व 13 विकेट्स घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय वन डे व ट्वेंटीत त्यानं अनुक्रमे 226 व 78 सामने खेळले. वन डेत त्याच्या नावावर 5615 धावा व 36 विकेट्स, तर ट्वेंटी-20त 1605 धावा व 13 विकेट्स आहेत.

IPL मध्येही रैनानं दमदार खेळी केली आहे. त्याच्या नावावर IPLमध्ये एका शतकाचा समावेश आहे. त्यानं 193 सामन्यांत 33.34च्या सरासरीनं 5368 धावा केल्या आहेत. त्यात 1 शतक व 38 अर्धशतकांचा समावेश आहे.

त्याच्या नावावर 493 चौकार व 194 षटकारही आहेत आणि त्यानं 101 झेलही टिपले आहेत. शिवाय त्याच्या नावावर 25 विकेट्सही आहेत. असा हा अष्टपैलू खेळाडू गमावल्यानं CSKला नक्कीच मोठा धक्का बसेल.

Indian Premier League मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये Royal Challanger Banglore ( RCB) संघाचा कर्णधार विराट कोहली 5412 धावांसह अव्वल स्थानावर आहे. कोहलीनं ( Virat Kohli) 177 सामन्यांत 5 शतकं व 36 अर्धशतकं झळकावली आहेत. त्यात 480 चौकार व 190 षटकार आहेत.

सुरेश रैना ( Suresh Raina) या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानं 193 सामन्यांत 33.34च्या सरासरीनं 5368 धावा केल्या आहेत. त्यात 1 शतक व 38 अर्धशतकांचा समावेश आहे. पण, यंदा तो खेळणार नसल्यानं त्याचे हे स्थान जाऊ शकते. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) दुसरे स्थान पटकावू शकतो. रोहितनं 188 सामन्यांत 4898 धावा केल्या आहेत. रोहितला हा विक्रम मोडण्यासाठी 470 धावांची गरज आहे.

सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांत सुरेश रैना पाचव्या स्थानावर आहे. त्याच्या नावावर 194 षटकार आहे आणि विराट 190 षटकारांसह सहाव्या स्थानी आहे. हेही स्थान रैना गमावणार आहे.