गुजरातमधील पालिका निवडणुकीवरून रवींद्र जडेजाच्या कुटुंबात फूट, प्रचारावरून पडले दोन गट

Ravindra Jadeja's family split over Gujarat municipal elections: गुजरातमधील पालिका निवडणुकीवरून रवींद्र जडेजाच्या कुटुंबात दोन गट पडले आहेत.

सध्या गुजरातमधील सहा महानगरपालिकांमधील निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरू आहे. या निवडणुकीदरम्यान भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजाचे कुटुंब चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. त्याचे कारणही तसेच खास आहे.

गुजरातमधील पालिका निवडणुकीवरून रवींद्र जडेजाच्या कुटुंबात दोन गट पडले आहेत. जडेजाचे कुटुंब कुठल्या एका पक्षाचा प्रचार करत नाही आहे. यामध्ये रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा ही भाजपाचा प्रचार करत आहे. तर जडेजाची बहीण नयनाबा जडेजा काँग्रेससाठी प्रचार करत आहे.

गुजरातमध्ये सहा महानगरपालिकांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये अहमदाबाद, सूरत, बडोदा, राजकोट, जामनगर आणि भावनगरचा समावेश आहे. रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा भाजपा उमेदवारांसाठी राजकोटमध्ये प्रचार करत आहे. तर बहीण नयनाबा काँग्रेससाठी जामनगरमध्ये प्रचार करत आहे.

रवींद्र जडेजाची पत्नी २०१७ मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीवेळी भाजपामध्ये दाखल झाली होती. मात्र स्थानिक पालिका निवडणुकीत प्रथमच प्रचारासाठी भाजपाच्या मंचावर आली आहे. मी भाजपाशी वैचारिकरीत्या जोडले गेले आहे. त्यामुळे येथे प्रचारासाठी आले आहे, असे रवींद्र जडेजाच्या पत्नीने सांगितले.

दुसरीकडे जडेजाची बहीण नयनाबा जामनगरमध्ये काँग्रेससाठी निवडणुकीचा प्रचार करत आहे. जामनगरच्या पालिका निवडणुकीमध्ये नयनाबा घरोघरी जाऊन प्रचार करत आहे.