Prithvi Shaw : पृथ्वी शॉच्या नाबाद १८५ धावा; एका फटक्यात मोडला MS Dhoni अन् विराट कोहलीचा मोठा विक्रम

Prithvi Shaw scored unbeaten 185 runs from just 123 balls पृथ्वी शॉ यानं १२३ चेंडूंत नाबाद १८५ धावा केल्या. त्यापैकी १२६ धावा या त्यानं केवळ २८ चेंडूंत चौकार व षटकारांनी केल्या. पृथ्वीनं २१ चौकार व ७ षटकार खेचले.

विजय हजारे ट्रॉफी २०२१ ( Vijay Hazare Trophy 2021) स्पर्धेत मुंबईचा फलंदाज पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) याचा फॉर्म दमदारच सुरू आहे. विजय हजारे ट्रॉफीत सर्वोत्तम वैयक्तिक २२७* ( वि. पुद्दुचेरी) धावांची खेळी करण्याचा विक्रम करणाऱ्या पृथ्वीनं मंगळवारी उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सौराष्ट्रच्या गोलंदाजांची धुलाई केली.

सौराष्ट्राच्या ५ बाद २८४ धावांचा पाठलाग करताना पृथ्वीनं एकट्यानं प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या. त्यानं ६७ चेंडूंत शतक पूर्ण केले. पृथ्वीनं नाबाद १८४ धावांची खेळी करताना मुंबईला ९ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. मुंबईनं ४१.३ षटकांत १ बाद २८४ धावा करून सामना जिंकला.

प्रथम फलंदाजी करताना सौराष्ट्रकडून समर्थ व्यास ( ९०), चिराग जानी ( ५३) आणि विश्वराजसिंग जडेजा ( ५३) यांनी अर्धशतकी खेळी केली. सलामीवीर अवी बरोट व स्नेल पटेल यांनी अर्धशतकी भागीदारी केली, परंतु त्यांना अनुक्रमे ३७ व ३० धावांच्या वैयक्तिक खेळीवर माघारी जावे लागले.

प्रेरक मांकड ( ४) व अर्पित वसावडा ( १०) हे माघारी परतल्यानंतर जडेजा व व्यास यांनी फटकेबाजी केली. त्यानंतर जानीनं डाव सावरला आणि संघाला ५ बाद २८४ धावांपर्यंत समाधानकारक मजल मारून दिली. मुंबईच्या शाम्स मुलानीनं सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या.

त्यानंतर फलंदाजीला आलेल्या पृथ्वी शॉ व यशस्वी जैस्वाल या युवा फलंदाजांनी सौराष्ट्रच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. पृथ्वीनं ६७ चेंडूंत शतक पूर्ण केले. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी २३८ धावांची विक्रमी भागीदारी केली. यशस्वी १०४ चेंडूंत १० चौकार व १ षटकार खेचून ७५ धावांवर माघारी परतला.

मुंबईनं हा सामना सामना ९ विकेट्स राखून जिंकताना उपांत्य फेरीत प्रवेश केला. पृथ्वी शॉ यानं १२३ चेंडूंत नाबाद १८५ धावा केल्या. त्यापैकी १२६ धावा या त्यानं केवळ २८ चेंडूंत चौकार व षटकारांनी केल्या. पृथ्वीनं २१ चौकार व ७ षटकार खेचले. आदीत्य तरे २० धावांवर नाबाद राहिला. मुंबईसमोर उपांत्य फेरीत कर्नाटकचे आव्हान असणार आहे. ११ मार्चला हा सामना खेळवण्यात येईल.

विजय हजारे ट्रॉफी २०२०-२१स्पर्धेतील पृथ्वी शॉ याचे तिसरे शतक आहे. त्यानं दिल्ली विरुद्ध २१२ धावांचा पाठलाग करताना ८९ चेंडूंत नाबाद १०५ धावा केल्या होत्या. पुद्दुचेरीविरुद्ध १५२ चेंडूंत नाबाद २२७ धावा आणि आज सौराष्ट्रविरुद्ध २८५ धावांचा पाठलाग करताना १२३ चेंडूंत नाबाद १८५ धावा केल्या. त्यानं सहा सामन्यांत एक द्विशतक, दोन शतकांसह १९६.३च्या सरासरीनं ५८९ धावा चोपल्या आहेत.

पृथ्वीच्या नाबाद १८५ धावांच्या खेळीनं महेंद्रसिंग धोनी व विराट कोहली यांचा विक्रम मोडला, लिस्ट ए क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करतानाही ही भारतीय खेळाडूची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. यापूर्वी महेंद्रसिंग धोनीनं २००५मध्ये श्रीलंकेविरुद्ध नाबाद १८३ आणि विराट कोहलीनं २०१२मध्ये पाकिस्तानविरुद्ध १८३ धावा केल्या होत्या.

विजय हजारे ट्रॉफीत सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा विक्रमही पृथ्वीच्या नावावर आहे. त्यानं या मोसमात पुद्दुचेरीविरुद्ध नाबाद २२७ धावा चोपल्या होत्या. त्यानंतर संजू सॅमसन २१२*, यशस्वी जैस्वाल २०३, कर्ण कौशल २०२, वेंकटेश अय्यर १९८, रविकुमार समर्थ १९२, अजिंक्य रहाणे १८७ आणि पृथ्वी शॉ १८५* असा क्रमांक येतो.