PAKvBAN : ICC जागतिक कसोटीत पाकिस्तानची मोठी झेप; देतील का टीम इंडियाला आव्हान?

पाकिस्तान क्रिकेट संघानं सोमवारी बांगलादेश संघावर एक डाव आणि 44 धावांनी दणदणीत विजय मिळवून दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

बांगलादेशचा पहिला डाव 233 धावांवर गुंडाळला. शाहीन आफ्रिदीनं सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. त्याला मोहम्मद अब्बास आणि हॅरीस सोहेल यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेत चांगली साथ दिली.

त्यानंतर पाकिस्ताननं पहिल्या डावात 445 धावा चोपल्या आणि 212 धावांची आघाडी घेतली. शान मसूद ( 100) आणि बाबर आझम ( 143) यांची शतकी खेळी, तर असद अफीक ( 65) व हॅरीस सोहेल ( 75) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर पाकिस्ताननं ही मजल मारली.

दुसऱ्या डावातही बांगलादेशची पडझड सुरूच राहिली. त्यांचा संपूर्ण संघ 168 धावांत तंबूत पाठवून पाकिस्ताननं एक डाव व 44 धावांनी दणदणीत विजय मिळवला.

बांगलादेशचा कर्णधार मोमिनूल हक ( 41), नजमुल होसैन शांतो ( 38) आणि तमीम इक्बाल ( 34) यांनी प्रयत्न केले. पण, त्यांना पाकिस्तानच्या गोलंदाजांसमोर अपयश आले.

दुसऱ्या डावात पाकिस्तानच्या नसीम शाह व यासीर शाह यांनी प्रत्येकी चार विकेट्स घेतल्या. शाहीन आफ्रिदी आणि मोहम्मद अब्बास यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केले.

या सामन्यात नसीम शाहनं ( 4/26) हॅटट्रिक नोंदवून वर्ल्ड रेकॉर्ड केला. आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा तो युवा गोलंदाज ठरला. त्याचं वय 16 वर्ष व 359 दिवस आहे. हा विक्रम बांगलादेशच्या आलोक कपालीच्या नावावर होता. त्यानं 2003मध्ये वयाच्या 19व्या वर्षी पाकिस्तानविरुद्ध हॅटट्रिक घेतली होती.

या विजयाबरोबर पाकिस्तान संघानं आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. पाकिस्तानच्या खात्यात 5 सामन्यांत 140 गुण झाले आहेत. टीम इंडिया 360 आणि ऑस्ट्रेलिया 296 गुणांसह अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानी आहे. इंग्लंड 146 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.