मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजाची कमाल, २७ धावांत ४ विकेट्स अन् संघानं मिळवला १७२ चेंडू व ८ विकेट्स राखून विजय

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वाला ९ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. पाच वेळचा विजेता मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal challengers Bangalore) यांच्यात सलामीचा सामना होणार आहे. तत्पूर्वी, मुंबई इंडियन्सचा खेळाडूनं आंतरराष्ट्रीय वन डे सामन्यात दमदार कामगिरी केली आहे.

न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यातल्या मालिकेतील पहिला वन डे सामना शनिवारी खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा प्रमुख गोलंदाज ट्रेंट बोल्ट ( Trent Boult) यानं दमदार कामगिरी केली. त्यानं ८.५ षटकांत २७ धावा देताना ४ विकेट्स घेतल्या.

जेम्स निशॅम व मिचेल सँटनर यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेत बोल्टला उत्तम साथ दिली आणि बांगलादेशचा डाव ४१.५ षटकांत १३१ धावांवर गडगडला. महमदुल्लाहने सर्वाधिक २७ धावा केल्या.

युनिव्हर्सिटी ओव्हल येथे वन डे सामन्यात बोल्टनं तिसऱ्यांदा ४+ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. असा विक्रम एकाही गोलंदाजाला जमलेला नाही.

न्यूझीलंडनं हे लक्ष्य २१.२ षटकांत २ बाद १३२ धावा करून पार केले. मार्टीन गुप्तीलनं १९ चेंडूंत ३८ धावा ( ३ चौकार व ४ षटकार) केल्या. हेन्री निकोल्सनं नाबाद ४९ धावा केल्या.