ट्वेंटी-20 वर्ल्ड कप संघातून MS Dhoni, Shikhar Dhawan बाहेर; भारताच्या माजी खेळाडूनं निवडला संघ

ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टीम इंडियाच्या संघात कोणाला संधी मिळेल, कोणाला नाही याबाबत सांगणं थोडं अवघड आहे. पण, भारताचा माजी कसोटीपटू आकाश चोप्रानं गुरुवारी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी 14 सदस्यीय भारतीय संघ जाहीर केला.

त्याच्या या संघात महेंद्रसिंग धोनी आणि शिखर धवन या दोघांनाही स्थान न मिळाल्यानं सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेपासून धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूरच आहेत, तर धवनला ट्वेंटी-20 संघातील स्थान पक्कं करता आलेलं नाही.

रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांची सलामीवीर म्हणून निवड केली आहे. 2013पासून रोहित मर्यादित षटकांच्या सामन्यांत सलामीला येत आहे, तर राहुलनं ट्वेंटी-20तील त्याचे स्थान पक्कं केलं आहे.

न्यूझीलंड दौऱ्यावर त्यानं ट्वेंटी-20 मालिकेत पाच डावांत 224 धावा केल्या, तर तीन वन डे सामन्यांत 204 धावा केल्या.

रोहित-राहुलनंतर मधल्या फळीत कर्णधार विराट कोहली आणि त्यानंर रिषभ पंत यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे.

चोप्रानं निवडलेल्या संघात हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे या दोन अष्टपैलू खेळाडूंना संधी दिली आहे. संघात रवींद्र जडेजा हा तिसरा अष्टपैलू खेळाडू आहे.

फिरकीची जबाबदारी कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहलवर सोपवली आहे. जलदगती गोलंदाजीची जबाबदारी जसप्रीत बुमराह, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांच्यावर असेल.

आकाश चोप्राचा संघ - रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी