शाहिद आफ्रिदीच्या All Time वर्ल्ड कप संघात Sachin Tendulkarला स्थान नाही

पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीनं शुक्रवारी त्याचा ऑल टाईम वर्ल्ड कप संघ निवडला. पण, त्याच्या या संघात महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि महान गोलंदाज इम्रान खान यांना स्थान मिळालेलं नाही.

वन डे वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात तेंडुलकरच्या नावावर 2278 सर्वाधिक धावा आहे, इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्ताननं वर्ल्ड कप जिंकला होता. तरीही आफ्रिदीनं त्याच्या संघात या दोघांना स्थान दिलेले नाही.

आफ्रिदीच्या या संघात सलामीची जबाबदारी माजी सहकारी सईद अन्वर आणि ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक-फलंदाज अॅडम गिलख्रिस्ट यांना स्थान दिले आहे. अन्वरने वर्ल्ड कप स्पर्धेतील 21 सामन्यांत 915 धावा, तर गिलख्रिस्टनं 31 सामन्यांत 1085 धावा केल्या आहेत.

त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार रिकी पाँटिंग याची निवड केली आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीला या संघात स्थान दिले आहे. कोहलीनं ट्वेंटी-20 आणि वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत 26 सामन्यांत 1030 धावा केल्या आहेत.

पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हकने आफ्रिदीच्या संघात स्थान पटकावले आहे. इंझमान-उल-हक हा पाकिस्तानच्या 1992च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य होता.

इम्रान खान यांना वगळून आफ्रिदीनं दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू जॅक कॅलिसची निवड केली आहे.

गोलंदाजी विभागात आफ्रिदीनं तीन जलदगती गोलंदाज निवडले आहेत. वसीम अक्रम, ग्लेन मॅकग्रा आणि शोएब अख्तर यांनी वर्ल्ड कप स्पर्धेत अनुक्रमे 55, 71 आणि 30 विकेट्स घेतल्या.

फिरकी गोलंदाजांमध्ये शेन वॉर्न आणि साकलेन मुश्ताक यांची निवड झाली असून या दोघांच्या नावावर वर्ल्ड कप स्पर्धेत अनुक्रमे 32 व 23 विकेट्स आहेत.

आफ्रिदीनं निवडलेला वर्ल्ड कप संघ - सईद अन्वर, अॅडम गिलख्रिस्ट, रिकी पाँटिंग, विराट कोहली, इंझमाम-उल-हक, जॅक कॅलिस, वसीम अक्रम, ग्लेन मॅकग्रा, शेन वॉर्न, शोएब अख्तर, साकलेन मुश्ताक.