न्यूझीलंडची महिला खेळाडू लै डेंजर; रोहित, सचिनसह कुणालाच नाही जमला हा पराक्रम

महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावावरील अनेक विक्रम आजही मोडणं कुणालाही शक्य नाही. मग तो त्याच्या 100 आंतरराष्ट्रीय शतकांचा असो किंवा सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावांचा...

वन डे क्रिकेटमध्ये सर्वप्रथम 200 धावा करणाऱ्या पुरुष क्रिकेटपटूचा विक्रमही तेंडुलकरच्या नावावर आहे. त्यानंतर वीरेंद्र सेहवाग, ख्रिस गेल, मार्टिन गुप्तील आणि फाखर जमान यांनी वन डे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावले.

तेंडुलकरनं 2010मध्ये द्विशतक झळकावले, परंतु त्याच्याही 1997मध्ये ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्क या महिला क्रिकेटपटूनं वन डेत द्विशतक झळकावण्याचा मान पटकावला. बेलिंडानं डेन्मार्कविरुद्ध नाबाद 229 धावा चोपल्या होत्या.

त्यानंतर पुरुष क्रिकेटमध्ये पहिल्या द्विशतकासाठी 2010वर्ष उजाडलं. तेंडुलकरनं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ग्वालियर येथे नाबाद 200 धावा केल्या. त्यानंतर सेहवागनं ( 2011) वेस्ट इंडिजविरुद्ध 219 धावा चोपल्या.

रोहित शर्मानं असा पराक्रम तीन वेळा केला. त्यानं 2013मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 209, 2014मध्ये श्रीलंकेविरुद्ध 264 आणि 2017मध्ये श्रीलंकेविरुद्ध नाबाद 208 धावा चोपल्या आहेत.

त्यानंतर 2015मध्ये न्यूझीलंडचा गुप्तील ( 237* वि. वेस्ट इंडिज) आणि वेस्ट इंडिजचा गेल ( 215 वि. झिम्बाब्वे) यांनी द्विशतक झळकावले.

2018मध्ये पाकिस्तानच्या झमाननं झिम्बाब्वेविरुद्ध नाबाद 210 धावांची खेळी केली आणि द्विशतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या पंक्तित स्थान पटकावलं.

2018मध्येच या पंक्तित आणखी एका महिला खेळाडूच्या नावाचा समावेश झाला. न्यूझीलंडच्या महिला संघाची अष्टपैलू खेळाडू अॅमेलिया केर हीनं द्विशतक झळकावले.

पण, केरची कामगिरी ही सर्वांवर भारी पडणारी ठरली. सचिन, रोहित, वीरू, गेल, गुप्तील यापैकी कोणालाही अशी कामगिरी करता आलेली नाही.

आयर्लंड महिला संघाविरुद्धच्या या सामन्यात केरनं 145 चेंडूंत 31 चौकार व 2 षटकार खेचून नाबाद 232 धावा चोपल्या. तिला एल कॅस्पेरेकनं 113 धावा करून चांगली साथ दिली.

केर आणि कॅस्परेक यांच्या फटकेबाजीच्या जोरावर न्यूझीलंडनं 3 बाद 440 धावा केल्या. आयर्लंडला 135 धावांत गुंडाळून न्यूझीलंडनं 305 धावांनी हा सामना जिंकला.

सर्व द्विशतकवीरांमध्ये केर सरस का ठरते ते जाणून घेऊया... केरनं केवळ फलंदाजीतच नव्हे तर गोलंदाजीतही आपले योगदान दिले. तिनं 7 षटकांत 2 निर्धाव षटकं फेकली आणि 17 धावा देत 5 विकेट्स घेतल्या.

वन डे क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात द्विशतक आणि पाच विकेट्स घेणारी ती जगातली पहिली आणि आतापर्यंत एकमेव खेळाडू आहे.