NZ vs PAK : न्यूझीलंडच्या विजयानं टीम इंडियाचं टेंशन वाढवलं; अजिंक्य रहाणेची कसोटी!

New Zealand vs Pakistan : केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघानं ऐतिहासिक कामगिरी केली. दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानचा धुव्वा उडवून न्यूझीलंडनं इतिहासात प्रथमच जागतिक कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले.

न्यूझीलंडनं दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानवर एक डाव व १७६ धावांनी दणदणीत विजय मिळवला. न्यूझीलंडनं पहिल्या डावात घेतलेल्या ३६२ धावांच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचा दुसरा डाव १८६ धावांवर गडगडला.

या विजयासह न्यूझीलंडनं कसोटी मालिका २-० अशी खिशात घातली आणि ICC कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाला मागे टाकून अव्वल स्थान पटकावले. न्यूझीलंडच्या या मालिका विजयानं टीम इंडियाचं टेंशन वाढवलं आहे.

न्यूझीलंडच्या कायले जेमिन्सननं ६९ धावांत ५ विकेट घेत पाकिस्तानला मोठे धक्के दिले. पाकिस्तानच्या पहिल्या डावातील २९७ धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडने ६ बाद ६५९ धावांवर पहिला डाव घोषित करून ३६२ धावांची आघाडी घेतली. केन विलियम्सन व हेन्री निकोल्स यांनी चौथ्या विकेटसाठी विक्रमी ३६९ धावांची भागीदारी केली.

निकोल्स २९१ चेंडूंत १८ चौकार व १ षटकार मारून १५७ धावांवर माघारी परतला. विलियम्सननं ३६४ चेंडूंत २८ चौकारांसह २३८ धावा केल्या. डॅरील मिचेलनं ११२ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह नाबाद १०२ धावा केल्या. न्यूझीलंडनं ६ बाद ६५९ धावांवर डाव घोषित करून पहिल्या डावात ३६२ धावांची आघाडी घेतली.

पाकिस्तानचा दुसरा डावही गडगडला. कायले जेमिन्सननं पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करताना सहा विकेट्स घेतल्या. ट्रेंट बोल्टनं ३ विकेट्स घेत त्याला साथ दिली. फलंदाजीत कमाल दाखवणाऱ्या केननं गोलंदाजीवरही हात आजमावला आणि कसोटीतील पहिली विकेट नावावर केली.

या विजयानंतर न्यूझीलंडच्या खात्यात ११८ गुण जमा झाले आहेत. ऑस्ट्रेलिया ( ११६) व भारत ( ११४) अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत.न्यूझीलंडनं प्रथमच आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे.

प्रथमच त्यांनी सलग सहा कसोटी सामने जिंकण्याचा विक्रम केला आहे. घरच्या मैदानावर मागील १७ सामन्यांत त्यांनी अपराजित मालिका कायम राखली आहे. २०११नंतर त्यांनी घरच्या मैदानावर एकाही कसोटीत पराभूत पत्करलेला नाही.

न्यूझीलंडनं या विजयानंतर ICC World Test Championship स्पर्धेतही १२० गुणांची कमाई केली. न्यूझीलंडच्या खात्यात ४२० गुण जमा झाले आहेत आणि ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

ऑस्ट्रेलिया ( ३२२) आणि टीम इंडिया ( ३९०) गुणांसह अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहेत. सरासरीच्या जोरावर या दोघांनी न्यूझीलंडला मागे ठेवले आहे. पण, टीम इंडिया ( ०.७२२) आणि न्यूझीलंड ( ०.७०) यांच्या सरासरीत फार अंतर नाही.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील पराभव आता भारताला महागात पडू शकतो. तसे झाल्यास न्यूझीलंड दुसऱ्या स्थानी सरकेल व टीम इंडिया अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडू शकते.