IPL 2021 Auction : मिचेल स्टार, जो रूट OUT; एस श्रीसंत, अर्जुन तेंडुलकर IN, जाणून घेऊया सर्वांची बेस प्राईज

ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज मिचेल स्टार्क ( Mitchell Starc) यानं इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वासाठी होणाऱ्या लिलावासाठी नाव नोंदवलेलं नाही. १८ फेब्रुवारीला चेन्नईत IPL 2021 Mini Auction पार पडणार आहे.

एकूण १०९७ खेळाडूंनी ( ८१४ भारतीय व २८३ विदेशी) या लिलावासाठी नाव नोंदणी केली आहे. पण, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी खेळाडू स्टार्क यंदाही आयपीएलपासून दूर राहणार आहे. त्यानं २०१५च्या आयपीएलमध्ये १३ सामन्यांत २० विकेट्स घेतल्या होत्या.

बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकिब अल हसन आणि भारताचा गोलंदाज एस श्रीसंत यांनी यंदाच्या आयपीएलसाठी नाव नोंदवले आहे. या दोघांवरही बंदीची कारवाई करण्यात आली होती. शकिबसह ११ खेळाडूंची बेस प्राईज ही २ कोटी ठेवण्यात आली आहे. यामध्ये केदार जाधव, हरभजन सिंग, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्हन स्मिथ, मोईन अली, सॅम बिलिंग, लायम प्लंकेट, जेसन रॉय, मार्क वूड व कॉलिन इंग्राम यांचा समावेश आहे.

भारताविरुद्धच्या पहिल्याच कसोटीत शतक झळकावणारा इंग्लंडचा कर्णधार जो रूट यानं नाव नोंदवलेलं नाही. त्याच्याव्यतिरिक्त हॅरी गर्नी व टॉम बँटन या इंग्लंडच्या खेळाडूंनीही आयपीएल २०२१ न खेळण्याचा निर्णय घेतला.

मुंबई इंडियन्सच्या २०२० सालच्या विजेत्या संघातील गोलंदाज जेम्स पॅटीन्सन यानेही आयपीएलमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 फलंदाजांमध्ये अव्वल असलेल्या डेवीड मलान याने नोंदणी केली असून १.५ कोटी अशी त्याची बेस प्राईज आहे. या बेस प्राईजच्या यादीत मुजीब उर रहमान, अॅलेक्स केरी, नॅथन कोल्टर-नायर, झाय रिचर्डसन, मिचेल स्वेप्सन, टॉम कुरन, लेवीस ग्रेगोरी, अॅलेक्स हेल्स, अॅडम लिथ, अदील रशीद आणि डेव्हिड विली यांचा समावेश आहे.

सात वर्षांची बंदी संपवून श्रीसंत पुन्हा आयपीएलमध्ये खेळण्यासाठी उत्सुक आहे. श्रीसंतची बेस प्राईज ७५ लाख आहे. त्याच्यासह ख्रिस मॉरिस हाही या यादीत आहे.

अॅरोन फिंच, उमेश यादव, हनुमा विहारी, मार्नस लाबुशेन व शेल्डन कोट्रेल यांना १ कोटीच्या बेस प्राईजमध्ये ठेवण्यात आले आहे.

चेतेश्वर पुजारा, करुण नायर, शिवम दुबे व वरुण अॅरोन हे ५० लाखांच्या बेस प्राईजमध्ये, तर अर्जुन तेंडुलकर हा २० लाखांच्या बेस प्राईज यादीत आहे.

अफगाणिस्तानचा १६ वर्षांचा डावखुरा फिरकी गोलंदाज नूर अहमद लकन्वाल हा यंदाच्या आयपीएलसाठी नाव नोंदवणारा युवा खेळाडू आहे. २० लाख ही त्याची बेस प्राईज आहे. ४२ वर्षीय नयन दोशी हे सर्वात वयस्कर खेळाडू आहेत. एस संतमूर्थी ( पाँडीचेरी) आणि हरभजन हे ४० वर्षीय खेळाडूही लिलावात आहेत.