महेंद्रसिंग धोनी एन्जॉय करतोय सुट्टी; खास डेस्टिनेशनला दिली भेट

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी निवृत्ती घेणार की नाही, घेणार तर कधी घेणार, तो टीम इंडियाकडून अखेरचा सामना खेळणार की मैदानाबाहेरच निवृत्ती जाहीर करणार, आदी अनेक प्रश्न चाहत्यांच्या डोक्यात बाऊंसरसारखे आदळत आहेत.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) नुकत्याच जाहीर केलेल्या सेंट्रल काँट्रॅक्टमधून धोनीला वगळले आहे. त्यानंतर धोनीला निवृत्तीचे संकेत देण्यात आले, असाही अर्थ लावण्यात आला.

सध्या धोनी विश्रांती घेत असून तो कान्हा अभयारण्यामध्ये फिरायला गेला होता. त्याचे हे फोटो पत्नी साक्षीने सोशल मीडियावर पोस्ट केले असून ते चांगलेच वायरल झाले आहेत.

आगामी इंडियन प्रीमिअर लीग ही धोनीच्या भविष्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची आहे. पण, आयपीएलमध्ये साजेशी कामगिरी करण्यात अपयश आल्यास धोनी निवृत्ती घेऊ शकतो, असे संकेत शास्त्रींनी दिले आहेत.

महेंद्रसिंग धोनीला सुरुवातीला मिडास राजाची उपमा देण्यात यायची. कारण धोनीने भारताला विजयामध्ये सातत्य राखण्याची सवय लावली. धोनीने भारताला २००७ साली ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकवून दिला.

धोनीने भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवून दिली, त्यानंतर भारताला कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावरही नेले. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे धोनीने २०११ साली भारताला विश्वचषक जिंकवून दिला होता.

सध्याच्या घडीला धोनीच्या विश्रांतीबरोबर त्याच्या भटकंतीची जोरदार चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी त्याला आणि साक्षीचा एक व्हिडीओ चांगलाच वायरल झाला होता. आता त्याचे हे फोटो पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.