मुंबई इंडियन्सच्या जेतेपदानंतर टीमसमोरच त्यानं केलं फिल्मी स्टाईल प्रपोज अन्...

भारतीय क्रिकेटपटूंचे बॉलिवूड कनेक्शन काही नवं नाही... क्रिकेट अन् बॉलिवूड हे एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यामुळेच अनेक क्रिकेटपटू अन् बॉलिवूड अभिनेत्री एकमेकांच्या प्रेमात पडलेली उदाहरणं आहेत.

भारतीय क्रिकेटपटूंमध्ये बॉलिवूडचा एवढा प्रभाव जाणवतो की, खेळाडू कधी कधी नटाच्या भूमिकेत जातात. त्यामुळेच त्यांच्यात अनेकदा फिल्मी अंदाज पाहायला मिळाला आहे.

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या यानं लहान भाऊ हार्दिकनंतर टीम इंडियात स्थान पटकावले असले तरी त्यानं स्वतःच्या कामगिरीवर स्थान टिकवून ठेवले आहे. 2017च्या आयपीएलनंतर कृणालसाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडले.

मुंबई इंडियन्सनं त्या सत्रात जेतेपद पटकावले आणि अंतिम सामन्यात कृणाल मॅन ऑफ दी मॅच होता. त्याच दिवशी त्यानं टीम समोर गर्लफ्रेंड पंखुडीला लग्नासाठी मागणी घातली.

कृणाल आणि पंखुडी यांची भेट एका कॉमन मित्राने करू दिली. त्या भेटीचं प्रेमात रुपांतर कधी झाले, ते दोघांनाही समजले नाही.

दुखापतीमुळे कृणाल बराच काळ मुंबईत होता आणि त्यादरम्यान त्याची अन् पंखुडीच्या भेटीचं सत्र सुरू झालं. हार्दिकलाही बऱ्याच दिवसानंतर हे माहीत पडलं.

पंखुडीचे कुटुंबीय मुंबईत राहतात. तिचे वडील राकेश शर्मा उद्योगपती आहेत, तर आई अनुपमा गोवा येथे इंटीरिअर डिझायनर आहे. पंखुडी कुटुंबात सर्वात लहान आहे आणि तिच्या मोठ्या बहिणीचं नाव तान्या आहे.

कृणालनं त्याच्या लव्ह स्टोरीबद्दल सांगितले की,''पंखुडी माझी चांगली मैत्रीण होती. आम्ही दोन वर्षांपूर्वी एकमेकांना भेटलो होते आणि तिचा साधेपणा मला खूप आवडला. मुंबई इंडियन्स जेव्हा चॅम्पियन बनली आणि मला फायनलमध्ये मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार मिळाला त्यानंतर मी पंखुडीला प्रपोज करण्याचा विचार केला. मी लग्नाची मागणी घालताच तिनं त्वरीत होकार दिला.''

पंखुडीनं सांगितलं की,''सामन्यानंतर तो हॉटेलच्या रुममध्ये गाणं गात आला. त्यावेळी मी आणि हार्दिक रुममध्येच होतो. तो जेतेपदामुळे प्रचंड आनंदी झालाय, असं आम्हाला वाटलं. पण, त्याच्यापाठोपाठ संघातील सर्वच खेळाडू आले आणि कृणालनं मला उभं राहण्यास सांगितले. मी उभी राहताच त्यानं मला लग्नाची मागणी घातली. कृणाल असं प्रपोज करेल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.''

2017 मध्ये डिसेंबर महिन्यात दोघांनी लग्न केलं.