IPL Auction 2020: 332 नव्हे 338 खेळाडूंवर लागणार बोली; सहा नव्या खेळाडूंची एन्ट्री

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) पुढील मोसमासाठी कोलकाता येथे आज खेळाडूंचा लिलाव होणार आहे. 73 जागांसाठी 332 खेळाडू रिंगणार आहेत. या यादित 186 भारतीय, 143 परदेशी आणि 3 संलग्न देशांतील खेळाडूंचा समावेश आहे. 24 नव्या खेळाडूंचा समावेश असून यात वेस्ट इंडिजचा केस्रीक विलियम्स, बांगलादेशचा कर्णधार मुश्फीकर रहीम आणि ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अॅडम झम्पा यांचा समावेश आहे. याशिवाय सरे संघाचा 21 वर्षीय फलंदाज विल जॅक्स याची एन्ट्री लक्षवेधी ठरत आहे.

पण, यात आणखी नव्या सहा खेळाडूंनी एन्ट्री घेतली आहे. त्यामुळे आता लिलावात 332 नव्हे तर 338 खेळाडूंवर बोली लागणार आहे. जाणून घेऊया हे सहा नवे खेळाडू कोण ते...

विनय कुमारः भारतीय क्रिकेटमध्ये हे नाव चांगलेच परिचयाचे आहे. त्यानं इंडियन प्रीमिअर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, कोची टस्कर्स, कोलकाता नाइट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याला 2019मध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही.

अशोक दिंडाः बंगालच्या या गोलंदाजानं आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स, दिल्ली डेअरडेव्हिल्स, पुणे वॉरियर्स इंडिया, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. परंतु मागील दोन सत्रात त्याला आयपीएलमध्ये खेळता आलेले नाही. 35 वर्षीय गोलंदाजावर कोण बोली लावतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

रॉबीन बिस्तः दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या 2012च्या संघातील हा फलंदाज मागील बरीच वर्ष आयपीएलपासून दूर आहे. त्यां 30 ट्वेंटी-20 सामन्यांत 46च्या सरासरीनं 395 धावा केल्या आहेत.

संजय यादवः कोलकाता नाइट रायडर्सच्या 2017च्या चमूतील हा अष्टपैलू खेळाडू आपला प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला आहे. त्यानं 17 सामन्यांत 359 धावा केल्या आणि 8 विकेट्स घेतल्या आहेत.

मॅथ्यू वेडः 2011मध्ये ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूनं दिल्ली डेअरडेव्हिल्सच प्रतिनिधित्व केलं होतं. त्यानंतर त्याला कोणत्याही संघानं घेतलं नाही. बिग बॅश लीगमध्ये त्यानं मेलबर्न स्टार्स, मेलबर्न रेनेगाड्स आणि होबार्ट हरिकेन्स आदी संघांचे प्रतिनिधित्व केले आहे.

जॅक विथराल्डः ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूनं आतापर्यंत 33 ट्वेंटी-20 सामने खेळले आहेत आणि त्यानं दक्षिण ऑस्ट्रेलियाविरुद्ध याच महिन्यात प्रथम श्रेणी क्रिकेटमधले शतकही झळकावले आहे. त्यानं 127.77च्या स्ट्राइक रेटनं धावा चोपल्या आहेत.