IPL Auction 2020 : युवा नव्हे, तर वयस्कर खेळाडूही खाणार भाव!

इंडियन प्रीमियर लीग(आयपीएल) 2020 च्या हंगामासाठी 19 डिसेंबरला कोलकाता येथे लिलाव प्रक्रिया होणार असून या लिलावासाठी एकूण 971 क्रिकेटपटूंनी नोंदणी केली होती. त्यातून 332 खेळाडूंची नावे अंतिम यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत.

या यादित 186 भारतीय, 143 परदेशी आणि 3 संलग्न देशांतील खेळाडूंचा समावेश आहे आणि त्यात 24 नवे खेळाडू आहेत. या लिलावात युवकांचा भरणा असला तरी काही वयस्कर खेळाडू भाव खाण्याची शक्यता आहे. आज आपण लिलावातील पाच वयस्कर खेळाडूंबद्दल जाणून घेऊया...

जीवन मेंडीस - 2013मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स ( आतााचा दिल्ली कॅपिटल्स) संघाचा सदस्य असलेला हा खेळाडू आठवणीतही नसेल. 2012च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत श्रीलंकेच्या या खेळाडूनं दमदार कामगिरी करून इंडियन प्रीमिअर लीगमधील मालकांचे लक्ष वेधले होते. दिल्ली डेअरडेव्हिल्सनं करारबद्ध केल्यानंतर त्याला बिग बॅस लीगमध्येही सिडनी सिक्सर संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. 2011मध्ये त्यानं श्रीलंकन संघाकडून पदार्पण केले आणि तीनही फॉरमॅटमध्ये मिळून एकूण 100 सामने खेळले आहेत. 2018मध्ये त्यानं बांगलादेशविरुद्ध अखेरचा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामना खेळला आहे. कोलंबोत जन्मलेल्या या अष्टपैलू खेळाडूचं सध्याचं वय हे 36 वर्ष आणि 334 दिवस आहे. यंदाच्या लिलावात त्याला 50 लाख मूळ किंमतीच्या गटात ठेवण्यात आले आहे.

युसूफ पठाण - आयपीएलचे काही हंगाम या फलंदाजानं गाजवले आहेत. त्याच्या अफलातून खेळीच्या जोरावरच राजस्थान रॉयल्सनं 2008मध्ये आयपीएलचे जेतेपद पटकावले. तीन वर्ष राजस्थानचे प्रतिनिधित्व केल्यानंतर तो कोलकाता नाइट रायडर्सच्या ताफ्यात दाखल झाला. कोलकाताच्या 2014च्या जेतेपदात बडोदाच्या या फलंदाजानं महत्त्वाचा वाटा उचलला. त्यानं 200 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अखेरच्या काही षटकांत 22 चेंडूंत 36 धावा चोपल्या होत्या. पण, मागील मोसमात त्याला 10 सामन्यांत केवळ 40 धावाच करता आल्या. 37 वर्षीय आणि 28 दिवसांच्या या खेळाडूला 1 कोटीच्या मूळ किंमतीच्या गटात ठेवले आहे.

बेन लॉघलीन- ऑस्ट्रेलियाच्या या जलदगती गोलंदाजाला प्रभावी कामगिरी करता आलेली नाही. 2009मध्ये त्यानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले. त्यानंतर त्यानं पाच वन डे व तीन ट्वेंटी-20 सामने खेळले. बिग बॅश लीगमध्ये होबार्ट हरीकेन्स आणि अॅडलेड स्ट्रायकर्स संघाचे प्रतिनिधित्व करताना त्यांना सर्वाधिक 95 विकेट्सचा विक्रम नावावर केला. 2018च्या मोसमात त्यानं राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व केले होते आणि त्यानं सात सामन्यांत 9 विकेट्स घेतल्या होत्या. पण, 2019मध्ये त्याला एकाही संघानं खरेदी केलं नाही. 37 वर्ष आणि 73 दिवस इतकं वय असलेल्या या खेळाडूला 50 लाख मूळ किंमतीच्या गटात ठेवले आहे.

फवाद अहमद - पाकिस्तानात जन्मलेला परंतु ऑस्ट्रेलियात स्थायिक झालेल्या या फिरकीपटूनं 2013मध्ये इंग्लंडविरुद्ध वन डे संघात पदार्पण केले. दोन ट्वेंटी-20त त्यानं तीन विकेट्स घेतल्या आहेत, तर तीन वन डेतही त्याच्या नावावर तितक्याच विकेट आहेत. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत त्याचा संघात समावेश करण्यात आला, परंतु त्याला एकही सामना खेळवला नाही. लिलिवात अनसोल्ड राहिलेल्या या खेळाडूचं वय हे 37 वर्ष व 313 दिवस आहे. त्याची मूळ किंमत 50 लाख ठरवण्यात आली आहे.

प्रविण तांबे - यंदाच्या लिलावातील सर्वात वयस्कर खेळाडूचा मान प्रविण तांबेनं पटकावला आहे. 48 वर्षीय या फिरकीपटूनं आयपीएलमध्ये आतापर्यंत राजस्थान रॉयल्स, गुजरात लायन्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. 2014मध्ये राजस्थानकडून खेळताना त्यानं 13 सामन्यांत 15 विकेट्स घेतल्य होत्या, परंतु पुढील दोन मोसमात त्याला समाधानकारक कामगिरी करता आली नाही. तीन वर्षांपूर्वी तो आयपीएलमध्ये खेळला होता आणि तो सध्या स्पर्धात्मक सामन्यातही खेळत नाही. त्याला 20 लाख मुळ किंमतीच्या गटात स्थान देण्यात आले आहे.