IPL 2021 : १८ फेब्रुवारीला होणाऱ्या लिलावात पाच भारतीय खेळाडूंवर फ्रँचायझी काट मारणार!

इंडियन प्रीमिअर लीगसाठी ( IPL 2021) १८ फेब्रुवारीला मिनी ऑक्शन चेन्नईत होणार आहे. आयपीएल गव्हर्निंग कांऊन्सिलची ६ जानेवारीला बैठक झाली आणि त्यात IPL 2021 Mini Auction घेण्याचा निर्णय घेतला. त्यात २१ जानेवारीपर्यंत रिटेन व रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्याच्या सूचना बीसीसीआयनं केल्या होत्या. त्यानुसार सर्व फ्रंचायझींनी मिळून १३९ खेळाडूंना कायम राखले, तर ५७ खेळाडूंना रिलीज केले.

ग्लेन मॅक्सवेल ( Glenn Maxwell) आणि स्टीव्ह स्मिथ ( Steven Smith) दोन मोठ्यानावांसह या लिलावात अनेक मोठ्या खेळाडूंसाठी चुरस रंगताना पाहायला मिळेल. या ऑक्शनसाठीच्या पात्र खेळाडूंची यादी १३ फेब्रुवारीला जाहीर होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

प्रत्येक संघाला २५ खेळाडूंचा कोटा पूर्ण करायचा आहे आणि त्यानुसार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( १३), किंग्स इलेव्हन पंजाब ( ९), राजस्थान रॉयल्स ( ८), कोलकाता नाइट रायडर्स ( ८) यांना सर्वाधिक खेळाडू ताफ्यात घ्यायचे आहेत, तर सनरायझर्स हैदराबाद ( ३) ला सर्वात कमी खेळाडू घ्यायचे आहेत.

RCB कडे ३५.९० कोटी शिल्लक आहेत. त्यानंतर CSK ( २२.९ कोटी), SRH ( १०.१ कोटी), DC ( १२.९० कोटी), KKR ( १०.७५ कोटी ), MI ( १५.३५ कोटी), KXIP ( ५३.२० कोटी), RR ( ३४.८५ कोटी) यांनाही शिल्लक बजेटमध्ये खेळाडू ताफ्यात दाखल करून घ्यायचे आहेत.

१८ फेब्रुवारीला चेन्नईत होणाऱ्या लिलावात काही मोठ्या नावांवर फ्रँचायझी काट मारण्याची शक्यता आहे. यामध्ये भारताच्या पाच स्टार खेळाडूंचा समावेश असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

केदार जाधव - चेन्नई सुपर किंग्सचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधव याच्यासाठी कदाचित किंग्स इलेव्हन पंजाब किंवा राजस्थान रॉयल्स बोली लावू शकतात. या दोन्ही संघांनी अनुक्रमे करुण नायर व रॉबिन उथप्पा यांना रिलीज केले आहे आणि केदार जाधव त्यांच्याजागी मधल्या फळीची उणीव भरून काढू शकतो. नुकत्याच पार पडलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ट्वेंटी-20त त्यानं दोन अर्धशतक झळकावली आहेत. पण, ३५ वर्षीय खेळाडू फिटनेस समस्येशी संघर्ष करत आहे आणि त्याला कदाचित यंदा करार मिळू शकणार नाही.

हरभजन सिंग - चेन्नई सुपर किंग्सनं रिलीज केलेला दुसरा महत्त्वाचा खेळाडू. आयपीएलमध्ये १५० विकेट्स घेणाऱ्या पाच गोलंदाजांमध्ये भज्जीचा समावेश आहे. ४० वर्षीय भज्जीसाठी फ्रँचायझीमध्ये चढाओढ रंगण्याची शक्यता फार कमी आहे.

करुण नायर - किंग्स इलेव्हन पंजाबनं कर्नाटकच्या या फलंदाजाला यंदा रिलीज केलं. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतही तो अपयशी ठरला.

मुरली विजय - चेन्नई सुपर किंग्सनं सलामीवीराला अधिक काळ बाकावरच बसवून ठेवले. आयपीएल २०२०त त्यानं तीन सामन्यांत ३२ धावा केल्या. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर एकूण २००० हून अधिक धावा आहेत, परंतु ३६ वर्षीय खेळाडूला यंदा करार मिळण्याची शक्यता फार कमी आहे.

पीयुष चावला - चेन्नई सुपर किंग्ससाठी आयपीएल २०२०त त्यानं ७ सामन्यांत ६ विकेट्स घेतल्या. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये चावला ( १५६ विकेट्स) तिसऱ्या स्थानावर आहे. त्यालाही यंदा करार मिळेल, अशी शक्यता कमीच आहे.

Read in English