IPL 2021: 'होय, आम्ही बिथरलोय', रिकी पाँटिंगचं भारतातील कोरोना वाढीवर मोठं विधान!

IPL 2021: भारतातील कोरोना रुग्णवाढीवर चिंता व्यक्त करत आतापर्यंत ऑस्ट्रेलियाचा चार खेळाडूंनी मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फलंदाज आणि कर्णधार रिकी पाँटिंगनंही अखेर त्याचं मत व्यक्त केलं आहे. (IPL 2021 Ricky Ponting opens up on the strange feeling in the Delhi Capitals camp amidst the COVID 19 pandemic)

IPL 2021: आयपीएलचं यंदा १४ वं सीझन सुरू आहे. पण भारतात गेल्या काही दिवसांपासून वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येमुळे आयपीएल रद्द करण्याची मागणी केली जात आहे. त्यात अनेक खेळाडू देखील भारतातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे स्पर्धेतून माघार घेत आहेत. यात आतापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या चार खेळाडूंनी मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे.

दिल्ली कॅपिटल्स संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग यानं आता भारतातील कोरोना रुग्णवाढीच्या मुद्द्यावर महत्वाचं विधान केलं आहे.

गेल्या काही आठवड्यापांसून भारतात कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या वाढताना दिसत आहे. दरदिवसाला देशात तीन लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळत आहेत. याच मुद्द्यावर बोलताना रिकी पाँटिंग यानं कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे संघ बिथरला असून याबाबत खेळाडूंमध्ये नक्कीच चर्चा होत आहे, अशी कबुली दिली आहे.

दिल्ली कॅपिटल्स संघाचे आयपीएलमध्ये आतापर्यंत सहा सामने झाले असून संघानं चार सामन्यांमध्ये विजय प्राप्त केला आहे. दिल्लीचा संघ सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. मैदानाबाहेर खेळाडू आणि संघात देशातील वातावरणाबाबत चर्चा होत असल्याचं पाँटिंगनं सांगितलं.

"संघातील खेळाडूंमध्ये कोरोना वाढीबाबत एक विचित्र भावना तयार झाली आहे. बाहेर काय चाललंय याची नक्कीच आम्हाला जाणीव आहे. भारतातील कोरोना रुग्णवाढीमुळे आम्ही बिथरलोय. भारतातील नागरिकाला जगण्यासाठी धडपड करावी लागतेय हे पाहून आमचं मन हेलावतं", असं रिकी पाँटिंग म्हणाला.

दरम्यान, दिल्ली कॅपिटल्स संघाचा मुख्य फिरकीपटू आर.अश्विन यानंही त्याच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण झाल्यामुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे. याबाबतही रिकी पाँटिंग यांनी भाष्य केलं.

"अश्विननं कुटुंबियांसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली आणि संघानं त्याला पाठिंबा दिला. संघातील एका खेळाडूसोबत घडत असलेल्या घटनेचा नक्कीच संघातील खेळाडूंवर परिणाम होतो आणि त्याबाबत चर्चाही होते. मला वाटतं बहुतेक संघांमध्ये असंच होत असेल", असं पाँटिंग म्हणाला.

रिकी पाँटिंग यानं परिस्थिती अतिशय गंभीर असल्याचं सांगतानाच स्पर्धेचं महत्व देखील अधोरेखित केलं. "जेव्हा एखाद्या मार्गावर तुम्ही चालत असता तेव्हा नक्कीच अडथळे येत असतात. पण आम्ही किती नशीबवान आहोत याची जाणीव आम्हाला आहे. देशात आज असे अनेक प्रेक्षक आणि क्रिकेट चाहते असतील की त्यांच्या चेहऱ्यावर आमच्यामुळे हास्य फुलत असेल. आजचा सामना पाहून अनेकांना आनंद मिळाला असेल आणि तो आम्ही देऊ शकतोय याचा आम्हालाही आनंद आहे", असं रिकी पाँटिंग म्हणाला.

दिल्ली कॅपिटल्सचा मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्धच्या सामन्यात अवघ्या एका धावेने पराभव झाला. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात क्रिकेट रसिकांची उत्सुकता ताणली गेली होती. अखेरीस कोहली ब्रिगेडनं सामना जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान प्राप्त केलं आहे.

दिल्ली कॅपिटल्स संघाचा आता पुढील सामना कोलकाता नाइट रायडर्स संघाविरुद्ध होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरच हा सामना खेळवला जाणार आहे. दरम्यान, आयपीएलमधून माघार घेण्याच्या वृत्तावर रिकी पाँटिंग यानं कोणतंही भाष्य केलेलं नाही.