IPL 2021: 'मी पैशांसाठी पगडी परिधान करत नाही', हरप्रीत ब्रारची अभिनेता अक्षय कुमारवर रोखठोक टीका

IPL 2021: आयपीएलमध्ये पंजाब किंग्जकडून जबरदस्त कामगिरी केलेल्या हरप्रीत ब्रारनं अभिनेता अक्षय कुमार याच्यावर जोरदार टीका केलीय. (ipl 2021 Paise ke liye Turban nahi pehnte hum When Punjab Kings Harpreet Brar slammed Akshay Kumar)

पंजाब किंग्ज संघाकडून शुक्रवारच्या सामन्यात मिळालेल्या संधीचं सोनं केलेल्या युवा गोलंदाज हरप्रीत ब्रारनं मैदानात तर धुमाकूळ घातलाच पण आता अभिनेता अक्षय कुमारवर टीका करुन नव्या वादाला फोडणी दिली आहे.

''मी पैशांसाठी पगडी परिधान करत नाही", अशी रोखठोक टीका हरप्रीत ब्रार यानं अक्षय कुमारवर केली आहे. हरप्रीत ब्रारनं केलेल्या या वक्तव्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्धच्या सामन्यात पंजाब किंग्जच्या २५ वर्षीय हरप्रीत ब्रार याच्या ७ चेंडूंनी सामनाच फिरवला. विराट, मॅक्सवेल व एबी हे जगातील तीन स्टार फलंदाज हरप्रीतच्या गोलंदाजीसमोर ढेपाळले अन् पंजाब किंग्सच्या विजयाचा मार्ग सोपा झाला.

हरप्रीत ब्रार पंजाबमधील मोगा समुदायाचं प्रतिनिधीत्व करतो. हरप्रीत ब्रारच्या कालच्या दमदार कामगिरीनंतर एका नेटिझननं हरप्रीत हा 'सिंग इज ब्लिंग' या बॉलिवूड चित्रपटातील अभिनेता अक्षय कुमार याच्यासारखा दिसतो असं म्हटलं.

"पाजी तू तर सिंग इज ब्लिंगच्या अक्षय कुमारसारखा दिसतोस'', असं एका नेटिझननं हरप्रीत ब्रार याचं कौतुक करताना म्हटलं. त्यावर हरप्रीतनं रिप्लाय दिला आणि त्याच्या रिप्लायनं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

२०१५ साली अभिनेता अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेला सिंग इज ब्लिंज नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यात अक्षय कुमार यानं एक पंजाबी तरुणाची व्यक्तिरेखा साकारली होती. त्यात अक्षय कुमार पगडी परिधान केलेला पाहायला मिळाला होता.

"मी पैशांसाठी पगडी परिधान करत नाही", असा रिप्लाय हरप्रीत ब्रार यानं दिला असून त्यानं #isupportfarmers असा हॅशटॅग वापरुन कृषी कायद्यांविरोधात लढात देणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे.

केंद्र सरकारनं लागू केलेल्या शेतकरी कायद्यांच्या विरोधात गेल्या महिन्यांपासून पंजाब आणि हरियाणामधील शेतकरी राजधानी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. हरप्रीत ब्रार देखील पंजाबचं प्रतिनिधीत्व करतो.

हरप्रीत ब्रार यानं कालच्या सामन्यानंतर सर्वांच लक्ष वेधून घेतलं. पंजाबकडून फलंदाजी करताना त्यानं १७ चेंडूत नाबाद २५ धावा केल्याच पण गोलंदाजीत कमाल दाखवत चार षटकांमध्ये केवळ १९ धावा देत तीन गडी बाद केले.