IPL 2021 in UAE : फ्रँचायझींनी सुरू केलं सेलिब्रेशन, जाणून घेऊयात पहिल्या टप्प्यातील प्रत्येक संघाची पोझिशन!

IPL has been moved to UAE for this season : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) ऑनलाईन पद्धतीने विशेष वार्षिक सभा आज पार पडली आणि त्यात इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वातील ( IPL 2021) उर्वरित सामने संयुक्त अरब अमिराती ( UAE) येथे खेळवणार असल्याचे जाहीर करण्यात आले. या घोषणेनंतर सर्व फ्रँचायझींनी त्यांच्या सोशल मीडियावरून या बातमीचं सेलिब्रेशन केलं.

या संघाचं यंदा गणितच बिघडलेलं पाहायला मिळत आहे. नितीश राणा, राहुल त्रिपाठी यांनी दणक्यात सुरूवात केली, परंतु नंतर ते ढेपाळले. इयॉन मॉर्गन व शुबमन गिल यांचा फॉर्म माती खात असल्याचे जाणवतेय. दिनेश कार्तिक व आंद्रे रसेल यांना फलंदाजीसाठी पुरेशी संधीच मिळत नाही. सुनील नरीनच्या मागे लागलेली साडेसाती आजही कायम आहे. शाकिब अल हसनलाही छाप पाडता आलेली नाही. यांच्यापेक्षा पॅट कमिन्स फलंदाजीत कमाल दाखवतोय. KKRला त्यांच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल करावा लागेल. गोलंदाजीची धुरा एकटा कमिन्स वाहतोय... KKRचे प्ले ऑफचे स्वप्न अवघडच आहे, परंतु काही बदल चमत्कार घडवू शकतील, अशी आशा करायला हरकत नाही. उर्वरित सात सामन्यांत ५-६ विजय हवेच हवे.

मागच्या वर्षी दुसऱ्या टप्प्यात या संघानं दमदार कमबॅक करताना ७ पैकी ६ सामने जिंकले होते, परंतु पहिल्या टप्प्यातील अपयशामुळे ते टॉप फोरमधून बाहेरच राहिले. यंदा त्यांना त्याच करिष्म्याची गरज आहे. पण, लोकेश राहुलच्या आजारपणानं त्यांची चिंता वाढवली आहे. मयांक अग्रवालचा फॉर्म परतला असला तरी अन्य खेळाडूंकडून त्याला साथ मिळत नाही. ख्रिस गेल, दीपक हुडा, शाहरूख खान यांना जोर लावावा लागेल, निकोलस पूरनचे अपयश हे संघासाठी मारक ठरले आहे. ७ सामन्यांत तो केवळ २८ धावा करू शकला आहे आणि त्यात चार भोपळे आहेत. जागतिक ट्वेंटी-२० क्रमवारीतील टॉपचा खेळाडू डेवीड मलान याला बाकावर सडवले जात आहे. मोहम्मद शमी अनुभव पणाला लावूनही काहीच करू शकत नाही. कोट्यधीश रिली मरेडीथनं निराश केलं आहे. अर्षदीप सिंग, रवी बिश्नोई, झाय रिचर्डसन यांना पुढाकार घ्यावा लागेल. हरप्रीत ब्रार या तुरूपाच्या पत्याला काढण्यात पंजाबनं उशीर केला आहे. आता त्यांना उर्वरित सहा सामन्यांत ४ विजय मिळवावेच लागतील त्याहून कमी विजय चालणार नाहीत.

संकट हे या संघाच्या पाचवीला पुजलं आहे. जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स, अँड्य्रू टाय व लायम लिव्हिंगस्टोन हे चार परदेशी खेळाडू एकामागोमाग माघारी परतले. आता उर्वरित चार परदेशी खेळाडूंसह या संघाला प्रतिस्पर्धींचा सामना करावा लागत आहे. संजू सॅमसननं सातत्या राखल्यास हा संघ काही करू शकतो, पण त्याला ते जमताना दिसत नाही. RRच्या फलंदाजीची भीस्त पूर्णपणे संजू सॅमसन व जोस बटलर यांच्यावर आहे. शिवम दुबे, राहुल टेवाटिया, यशस्वी जैस्वाल, रियान पराग व डेव्हिड मिलर यांना अपेक्षित साथ देता येत नाही. ख्रिस मॉरिस, मुस्ताफिजूर रहमान, चेतन सकारिया, जयदेव उनाडकट यांना प्ले ऑफच्या शर्यतीत संघाला कायम ठेवण्यासाठी आणखी जोर लावावा लागेल. त्यांना शिल्लक ७ सामन्यांपैकी किमान ४ सामन्यांत विजय मिळवावा लागेल आणि तसं करताना त्यांना नेट रनरेटवरही लक्ष ठेवावे लागेल.

पंजाब किंग्सकडून खेळताना ग्लेन मॅक्सवेलचा धावांचा आटलेला झरा RCBकडून धो धो वाहताना दिसत आहे. देवदत्त पडिक्कल हा मागील मोसमात संघाला सापडलेला हिरा आहे. विराट कोहली हा त्याला साथ देणारा दमदार फलंदाज आहे. मधल्या फळीत मॅक्सवेलसह एबी डिव्हिलियर्स आहेच. पण, RCBची फलंदाजांची फौज या चौघांवरच संपताना दिसत आहे. ही बाब मागील दोन पराभवांत प्रकर्षानं जाणवली. रजत पाटिदारला संधीचं सोनं करता आलेलं नाही, मोहम्मद अझरुद्दीन बाकावर बसून आहे. RCBला आता त्यांच्या स्ट्रॅटेजित बदल करावा लागेल. मोहम्मद अझरुद्दीनला मैदानावर उतरवावे लागेल. त्यांना २ ते ३ विजय पुरेसे असले तरी चुका न सुधारल्यास ते टॉप फोरमधून बाहेरही फेकले जाऊ शकतात. गोलंदाजीत हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, कायले जेमिन्सन हे योगदान देत असले तरी युझवेंद्र चहलचा हरवलेला फॉर्म हा संघाची चिंता वाढवणारा आहे.

श्रेयस अय्यरची दुखापतीमुळे स्पर्धेपूर्वीच माघार घेणे हा दिल्ली कॅपिटल्ससाठी मोठा धक्का होता. पण, रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्लीची वाटचाल योग्य दिशेनं सुरू आहे. मागच्या वर्षी दिल्लीनं अंतिम फेरीपर्यंत प्रवेश मारला होता आणि यंदा ती उपविजेतेपद ते जेतेपद ही रेषा ओलांडण्याचा निर्धार रिषभनं स्पर्धेपूर्वी बोलून दाखवला होता. शिखऱ धवन ३८० धावांसह ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे. पृथ्वी शॉ ( ३०८), रिषभ पंत ( २१४), स्टीव्ह स्मिथ ( १०४) यांची कामगिरी दिल्लीसाठी महत्त्वाची ठरत आहे. मार्कस स्टॉयनिस व शिमरोन हेटमायर हे त्यांच्या खऱ्या फॉर्मात अजून दिसले नसले तरी त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. गोलंदाजांमध्ये आवेश खान ( १४ विकेट्स) हा सप्राईज पॅकेज ठरतोय. कागिसो रबाडा, अक्षर पटेल, अमित मिश्रा व ललित यादव त्यांच्यावरील जबाबदारी चोख पार पाडत आहेत.

संघाची CEO काव्या मारन हिनं मॅच पाहणेच सोडून दिले असेल. एक पराभव अन् हैदराबाद प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद... डेव्हिड वॉर्नरची कर्णधारपदावरून उचलबांगडी केल्यानंतरही फार फरक पडलेला दिसला नाही. पहिल्याच सामन्यात केन विलियम्सन अपयशी ठरला. वॉर्नरला हटवल्यानं संघातील वातावरण गढूळ झाले आहे. वरवर सर्व सुरळीत दिसत असले तरी प्रत्यक्षात कुछ तो गडबड है, असंच म्हणावं अशी परिस्थिती आहे. राशिद खान वगळला तर अन्य गोलंदाजांनी पार निराश केले आहे. जॉनी बेअरस्टो व डेव्हिड वॉर्नर यांना अपेक्षित साथ इतरांकडून मिळत नाही. आता प्रत्येक सामना जिंकणे याशिवाय दुसरा पर्याय या संघासमोर नाही.

मुंबई इंडियन्ससाठी हे काही नवीन नाही, सुरूवातीला स्पर्धेबाहेर जाणार असे वाटत असताना हा संघ कधी गरूड भरारी घेतो अन् थेट फायनलला प्रवेश करतो हे कोडंच आहे. क्विंटन डी कॉकचा हरवलेला फॉर्म परत येणे ही संघासाठी चांगली बातमी आहे. रोहित शर्मा सातत्यानं त्याची भूमिका चोख बजावत आहे. सूर्यकुमार यादव व इशान किशन यांनी मागच्या वर्षी जी हवा केली होती, ती यंदा गायब झाल्याचे चित्र आहे. कृणाल व हार्दिक या पांड्या ब्रदर्सना MI आणखी किती पोसणार हा सवाल, आता प्रत्येक जण विचारू लागला नाही. दोघांनाही अपेक्षांवर खरं उतरता आलेलं नाही. त्यामुळे किरॉन पोलार्डवर मोठा भार पडतोय आणि तो सक्षमपणे तो पेलवतोयही... पण, असं किती काळ चालणार? गोलंदाजीत राहुल चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह यांची कामगिरी समाधानकारक झालेली आहे. मागील सामन्यात चेन्नईनं त्यांचीही लय बिघडवली आहे.

गतवर्षी यूएईत झालेली निराशाजन कामगिरी मागे सोडून चेन्नईचा संघ नव्या ताकदिनं मैदानावर उतरलेला दिसत आहे. ऋतुराज गायकवाड, फॅफ ड्यू प्लेलिस या दोन सलामीवीरांची कामगिरी संघाच्या विजयात महत्त्वाची ठरत आहे. RCBचा माजी खेळाडू मोईन अली CSKसाठी मोठं वरदानच घेऊन आला आहे. सुरेश रैना, रवींद्र जडेजा व अंबाती रायुडू हे अनुभवी त्रिकुट संघाला वाचवण्यासाठी खंबीर आहेत. महेंद्रसिगं धोनीची बॅट अद्याप तळपली नसली तरी त्याचे चाणाक्ष नेतृत्व संघासाठी नेहमीप्रमाणे फलदायीच ठरतेय. सॅम कुरन हा CSKला गवसलेला हिरा म्हणावा लागेल. फलंदाजीतही त्याचे योगदान संघाला मिळत आहे. दीपक चहर, शार्दूल ठाकूर, लुंगी एनगिडी यांनी सातत्य राखल्यास संघ अजून मजबूत होईल. ड्वेन ब्राव्हो संघात असून नसल्यासारखा आहे, पण दुसऱ्या टप्प्यात तोच महत्त्वाचा खेळाडू ठरणार आहे.