IPL 2021 : तीन वर्षांपूर्वी सोडणार होता क्रिकेट, ७ वर्षांच्या ट्रायलनंतर पंजाब किंग्सनं निवडलं; हरप्रीत ब्रारनं RCBच्या दिग्गजांना लोळवलं

हरप्रीत ब्रार ( Harpreet BRAR) हे नाव शुक्रवारपर्यंत फारसं कुणाच्या ओळखीचंही नव्हतं. पण, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर ( RCB) विरुद्धच्या सामन्यानंतर ते प्रत्येकाच्या ओठावर आहे. ( 3 yrs ago, Harpreet brar almost quit his Cricketing career nd decided to get settled down in Canada with his family, but at last moment Punjab Kings picked him)

हरप्रीत ब्रार ( Harpreet BRAR) हे नाव शुक्रवारपर्यंत फारसं कुणाच्या ओळखीचंही नव्हतं. पण, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर ( RCB) विरुद्धच्या सामन्यानंतर ते प्रत्येकाच्या ओठावर आहे. चंढीगडच्या झिराकपूर येथील हरप्रीतला पंजाब किंग्सनं ( Punjab Kings) मैदानावर उतरवले अन् त्यानं संधीचं सोनं केलं.

हरप्रीतनं पहिल्या दोन षटकांत १७ धावा दिल्या होत्या. ११व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर RCBचा कर्णधार विराट कोहली फटका मारण्यासाठी पुढे आला अन् चेंडू खाली राहिल्यानं तो थेट यष्टींवर आदळला. दुसऱ्या चेंडूत ग्लेन मॅक्सवेलचा उजवा त्रिफळा उडवून त्यानं मोठा धमाका केला. हे षटक निर्धाव गेलं अन् पुढच्याच षटकात हरप्रीतनं ग्लेन मॅक्सवेलला एक्स्ट्रा कव्हरवर उभ्या असलेल्या लोकेश राहुलकरवी झेलबाद करून माघारी पाठवले.

आयपीएल २०२१चा पहिलाच सामना खेळणाऱ्या कोणत्याही गोलंदाजाला जगातील तीन दिग्गज फलंदाजांना बाद करण्यात यश मिळाले, याहून अधिक आनंद काहीच होऊ शकत नाही. हरप्रीतनं गोलंदाजीत कमाल दाखवण्यापूर्वी फलंदाजीत २५ धावांचं योगदान देताना लोकेश राहुलसह सहाव्या विकेटसाठी ३२ चेंडूंत ६१ धावांची भागीदारी केली.

एकाच सामन्यात २५ धावा, ३ विकेट्स व १ निर्धाव षटक फेकणारा तो रवींद्र जडेजानंतर दुसरा खेळाडू ठरला. पंजाबकडून एकाच सामन्यात २५ धावा व ३ विकेट्स घेणाऱ्या युवराज सिंग ( २००९), पॉल व्हॅलथॅटी ( २०११), मार्कस स्टॉयनिस ( २०१६), अक्षर पटेल ( २०१७) यांच्यानंतरचा पाचवा खेळाडू ठरला.

आयपीएलमध्ये येण्यापूर्वी हरप्रीतनं ७ वर्ष स्थानिक क्रिकेटमध्ये बिग सिक्स हिटर असं नाव कमावलं. आयपीएलसाठी तो सतत ट्रायलही देत होता, परंतु निवड होत नसल्यानं तो हताश झाला होता. ३ वर्षांपूर्वी त्यानं जवळपास क्रिकेट सोडून कुटुंबीयांसोबत कॅनडात शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला होता.

हरप्रीतचे वडील मोहिंदर सिंग हे पंजाब पोलिसांत ड्रायव्हर होते. २०१९च्या आयपीएल लिलावात २० लाखांच्या मुळ किंमतीत पंजाबनं हरप्रीतला जेव्हा करारबद्ध केलं, तेव्हा मोहिंदर यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले होते. त्या दिवशी घरात पार्टीच साजरी झाली. लिलाव सुरू असताना हरप्रीत २३ वर्षांखालील क्रिकेट सामन्यासाठी जयपूरला गेला होता.

२०१९मध्ये त्यानं पंजाबकडून पदार्पण केलं. २ सामन्यांत त्यानं २० धावा केल्या. २०२०च्या लिलावापूर्वी पंजाबनं त्याला पुन्हा संघात कायम ठेवले. पण त्याला एकच सामना खेळवला. २०२१च्या पहिल्या सामन्यात केलेल्या जबरदस्त कामगिरीनंतर त्याच्याकडून अपेक्षाही उंचावल्या आहेत.

हरप्रीत ब्रार - माझ्या घरचे नक्कीच आनंदी झाले असतील. त्यांच्या शुभेच्छांमुळेच मला इथवर येता आले. मला षटकार खेचल्याचे कधीच वाईट वाटत नाही, कारण गोलंदाजाला कमबॅक करण्याची संधी असते. त्यामुळे मी पुनरागमन करेल, याची मला खात्री होती. आयपीएलमधील माझी पहिली विकेट विराटपाजी आणि त्याने मला मदत मिळाली. अशी विकेट मिळाल्यावर आत्मविश्वास वाढतो आणि सर्वकाही मनासारखं घडतं.