IPL 2021, CSK vs RCB Live : विराट कोहलीच्या नव्या भीडूनं मैदानावर उतरण्यापूर्वीच इतिहास रचला, CSKला घाम फुटला!

Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Live : चेन्नई सुपर किंग्सनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Live : चेन्नई सुपर किंग्सनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नईच्या संघात कोणताच बदल करण्यात आलेला नाही. अंबाती रायुडू आजचा सामना खेळण्यासाठी तंदुरूस्त आहे. बंगलोरच्या संघात दोन बदल पाहायला मिळत आहेत. या सामन्यात विराटनं सिंगापूरच्या टीम डेव्हिडला ( Tim David) खेळण्याची संधी दिली आणि त्याचे नाव प्लेइंग इलेव्हनमध्ये येताच नवा इतिहास घडला.

सिंगापूर संघाला अजूनही कसोटी व वन डे संघाचा दर्जा मिळालेला नाही आणि सिंगापूरच्या खेळाडू आयपीएल खेळणार आहे. आयपीएलमध्ये खेळणारा तो सिंगापूरचा पहिलाच खेळाडू ठरला. ( Singapore's Tim David today becomes the first ever cricketer to play an IPL match before his national team got Test or ODI status.)

डेव्हिड हा मुळचा ऑस्ट्रेलियाचा खेळाडू आहे, परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो सिंगापूर संघाचे प्रतिनिधित्व करतो. आयसीसीनं १०६ सदस्य देशांना ट्वेंटी-२०तील आंतरराष्ट्रीय दर्जा दिला आहे.

६ फुटांच्या डेव्हिडनं १५८पेक्षा अधिक स्ट्राईक रेटनं १४ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त ५५८ धावा केल्या आहेत. त्यानं एकूण ४९ ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत आणि त्यात बिग बॅश लीग, पाकिस्तान सुपर लीग मधील सामन्यांचा समावेश आहे. त्यात त्यानं ११७१ धावा केल्या आहेत.

बिग बॅश लीगमध्ये होबार्ट हरिकेन्स आणि पर्थ स्कॉर्चर्स संघाचे त्यानं प्रतिनिधित्व केले आहे. नुकत्याच झालेल्या रॉयल लंडन कप स्पर्धेत त्यानं सरे क्लबचे प्रतिनिधित्व करताना लिस्ट ए क्रिकेटमधील दोन शतकं झळकावली. त्यानं तीन सामन्यांत 140*(70), 52*(38) & 102(73) अशा धावा कुटल्या आहेत. त्याच्या समावेशनं RCBच्या मधळ्या फळीला मजबूती मिळणार आहे.

२५ वर्षांच्या डेव्हिडचे वडील रॉड हेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होते. त्यांनी १९९७च्या वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत सिंगापूर संघाचे प्रतिनिधित्व केलं होतं. डेव्हिड सिंगापूरचा नागरिक आहे, परंतु त्याचे कुटुंबीय ऑस्ट्रेलियात पुन्हा राहायला गेले अन् डेव्हिड तिथेच लहानाचा मोठा झाला.

आयसीसी ट्वेंटी-२० क्रमवारीत टीम डेव्हिड ५५व्या क्रमांकावर असून त्याचे रेटिंग ४५७ इतके आहे. ट्वेंटी-२० क्रमवारीत तो फॅफ ड्यू प्लेसिस, डेव्हिड वॉर्नर, रिषभ पंत, किरॉन पोलार्ड, शिमरोन हेटमायर, रॉस टेलर, स्टीव्ह स्मिथ यांच्याही पुढे आहे.