IPL 2021 : हिच का खिलाडूवृत्ती?, CSKला नमवण्यासाठी मुंबई इंडियन्सनं केली चिटींग!

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात शनिवारी झालेला सामना रोमहर्षक झाला. Brad Hogg raises the ‘spirit of the game’ question

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात शनिवारी झालेला सामना रोमहर्षक झाला. CSKच्या २१८ धावांचा पाठलाग करताना MIला अखेरच्या चेंडूपर्यंत संघर्ष करावा लागला. किरॉन पोलार्डनं एकहाती खिंड लढवताना मुंबईला विक्रमी लक्ष्याचा पाठलाग करून दिला. पण, या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या खिलाडूवृत्तीवर सवाल उपस्थित केला जात आहे.

मुंबई इंडियन्सनं अखेरच्या दहा षटकांत 138 धावा चोपल्या. आयपीएलमध्ये धावांचा पाठलाग करताना अखेरच्या दहा षटकांतील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. यापूर्वी 2019मध्ये MIनेच किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध 133 धावा केल्या होत्या. टी-20 लीगमध्ये अखेरच्या 10 षटकांतील ही तिसरी सर्वोत्तम धावसंख्या आहे. त्रिनबागो नाईट रायडर्सनं 2018च्या CPLमध्ये सेंट ल्युसिया स्टारविरुद्ध 144 धावा केल्या होत्या.

प्रथम फलंदाजी करताना फॅफ ड्यू प्लेसिस ( 50), मोईन अली ( 58) व अंबाती रायुडू ( 72) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर चेन्नईनं 20 षटकांत 4 बाद 218 धावांचा डोंगर उभा केला.

क्विंटन डी कॉक ( 38) व रोहित शर्मा ( 35) यांनी चांगली सुरुवात करून दिल्यानंतरही मुंबई जिंकेल असे वाटत नव्हते. पण, कृणाल पांड्या व पोलार्ड यांनी दमदार भागीदारी केली. कृणाल 32 धावांवर बाद झाला, परंतु पोलार्डची फटकेबाजी सुरूच होती. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात पोलार्डनं 34 चेंडूंत नाबाद 87 धावा केल्या.

शार्दुल ठाकूरने टाकलेल्या १८व्या षटकातील पाचवा चेंडू पोलार्डने उंच टोलावला. मात्र, पोलार्डचा हा झेल चक्क फाफ डूप्लेसिसच्या हातून सुटला आणि इथेच चेन्नईने सामना गमावला. त्या वेळी पोलार्ड ६८ धावांवर खेळत होता. हा झेल पकडला गेला असता, तर सामन्याचा निकाल वेगळा लागला असता.

अखेरच्या षटकात विजयासाठी १६ धावांची गरज असताना लुंगी एनगिडीनं पहिला चेंडू निर्धाव ठेवला. पोलार्डनं स्वतःहून सोपी धाव घेण्यास नकार देताना स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. त्यानंतर पुढील दोन चेंडूंवर चौकार खेचले. चौथा चेंडू पुन्हा निर्धाव राहिला. पाचव्या चेंडूवर षटकार खेचल्यानं १ चेंडूंत २ धावांची गरज MIला होती.

लुंगी एनगिडीनं चेंडू फेकण्यापूर्वीच नॉन स्ट्रायकर एंडला असलेल्या धवल कुलकर्णीनं क्रिज सोडले होते. त्यावरून आता नवा वाद सुरू झाला आहे. याआधीही नॉन स्ट्रायकर फलंदाज चेंडू टाकण्यापूर्वी क्रिज सोडत असल्याचा मुद्दा चर्चेत आला होता. काहींनी मांकडिंगला मान्यता देण्याचीही मागणी केली होती.

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉज यानं मुंबई इंडियन्सच्या खिलाडूवृत्तीवर सवाल केला. त्यानं ट्विट केलं की, कठोर शब्दाबद्दल माफी मागतो. कालच्या सामन्यात अखेरच्या चेंडूवर विजयासाठी दोन धावा हव्या होत्या आणि नॉन स्ट्रायकर फलंदाजानं गैरफायदा घेतला. याला तुम्ही खिलाडूवृत्ती म्हणाला का?''