IPL 2020 : मुंबई इंडियन्स पाचव्या जेतेपदासाठी सज्ज; पण 'ही' कमकुवत बाजू करू शकते घात!

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020 ) 13व्या पर्वाचे वेळापत्रक रविवारी जाहीर करण्यात आले. गतविजेता मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि तीन वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) यांच्यात सलामीचा सामना होणार आहे.

मुंबई इंडियन्सनं 2013, 2015, 2017 आणि 2019 अशी चार जेतेपद नावावर केली आहेत. 19 सप्टेंबरला अबु धाबी येथे मुंबई इंडियन्स ( MI) मैदानावर चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) सामना करण्यासाठी उतरणार आहे. पाचव्या जेतेपदासाठी मुंबई इंडियन्स ( MI) सज्ज आहे. जाणून घेऊया संघाची बलस्थानं व कमकुवत बाबी...

बलस्थानं - IPL Auction 2020त मुंबई इंडियन्सनं त्यांच्या ताफ्यात स्फोटक फलंदाज ख्रिस लीन ( Chris Lynn) याला दाखल करून घेतले. त्यामुळे मुंबई इंडियन्सची ( MI) सलामीचा ताकद वाढली आहे.

ख्रिस लीनच्या जोडीला दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक/फलंदाज क्विंटन डी'कॉक हा आणखी एक तगडा पर्याय संघासमोर आहे. डी'कॉक आणि लीन हे सलामीला आल्यानंतर कर्णधार रोहित शर्माला ( Rohit Sharma) तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येता येईल.

सुर्यकुमार यादव आणि इशान किशन हे चौथ्या स्थानासाठी दोन सक्षम पर्याय मुंबईकडे आहेत. त्यांच्या जोडीला हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या हेही आहेत.

फिरकीत कृणाल ( Krunal Pandya) आणि राहुल चहर ही ट्वेंटी-20 स्पेशालिस्ट गोलंदाज मुंबईकडे आहेत. रवींद्र जडेजा आणि युजवेंद्र चहल यांची उपस्थिती असल्यानं मुंबईच्या ( MI) खेळाडूंना राष्ट्रीय संघातील स्थानात सातत्य राखत येत नाही.

कमकुवत बाजू - IPL 2020 भारतात झाली असती, तर मुंबई इंडियन्स ( MI)कडे गोलंदाजांची फौज आहे. पण, आता संयुक्त अरब अमिराती ( UAE) येथे IPL 2020 होत असल्यामुळे क्वालिटी स्पिनर्सची उणीव संघाला जाणवू शकते.

राहुल चहर आणि कृणाल पांड्या हे दोन फिरकीपटू संघात आहे आणि ही दोघं प्रतिस्पर्धींच्या धावांवर लगाम लावण्यात सक्षम आहेत. तरीही मुंबई इंडियन्सला ( MI) विकेट टेकर फिरकीपटूची उणीव जाणवेल.

लसिथ मलिंगानं माघार घेतल्यानंतर MIकडे जसप्रीत बुमराह हाच तगडा जलदगती गोलंदाज आहे. ट्रेंट बोल्ट हा पर्याय आहे, परंतु IPLमध्ये त्यानं 8.78च्या इकॉनॉमी रेटनं गोलंदाजी केली आहे. नॅथन कोल्टर नील मागील दोन पर्वात खेळलेला नाही.

धवल कुलकर्णी हा अनुभवी गोलंदाज आहे, परंतु मागील तीन IPLमध्या तिचीही इकॉनॉमी 9 राहीली आहे. त्यानं 13 विकेट्स घेतल्या आहेत.

X फॅक्टर - हार्दिक पांड्या हा मुंबईची X फॅक्टर आहे. दुखापतीमुळे हार्दिक बराच काळ क्रिकेटपासून दूर होता आणि त्यानंतर लॉकडाऊनमुळे त्याला आणखी प्रतीक्षा पाहावी लागली. किरॉन पोलार्ड सध्या कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये धुमाकूळ घालत आहे. तोही मुंबईसाठी हुकमी एक्का ठरू शकतो.

मुंबई इंडियन्सचा संघ ( Mumbai Indians Team for IPL 2020) रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या, इशान किशन, सूर्यकुमार यादव, राहुल चहर, अनमोलप्रीत सिंग, जयंत यादव, अदित्य तरे, अनुकूल रॉय, क्विंटन डी कॉक, किरॉन पोलार्ड, मिचेल मॅक्लेघन, शेफ्राने रुथरफोर्ड, धवल कुलकर्णी, कोल्टर नील, ख्रिस लीन, सौरभ तिवारी, दिगिजय देशमुख, बलवंत राय, मोहसीन खान.