IPL 2020 : सामना भलेही RCBनं जिंकला, पण मनात कायमचं घर केलं ते या फोटोनं!

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) आणि मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) यांच्यातील सामना चुरशीचा होईल, याची सर्वांना अपेक्षा होती. पण, तो सुपर ओव्हरमध्ये जाईल, असा विचार कुणी केलाच नसावा..

प्रथम फलंदाजीला आलेल्या RCBनं आरोन फिंच ( Aaron Finch), देवदत्त पडीक्कल ( Devdutt Padikkal) आणि एबी डिव्हिलियर्स ( AB de Villiers) यांच्या अनुक्रमे 52, 54 आणि 55 धावांच्या जोरावर 3 बाद 201 धावांचा डोंगर उभा केला.

मुंबई इंडियन्सला सुरुवातीला बसलेल्या धक्क्यानंतर RCBचा विजय पक्का मानला जात होता. MIला अखेरच्या पाच षटकांत म्हणजेच 30 चेंडूत 90 धावा हव्या होत्या.

यंदाच्या आयपीएलमध्ये पहिलाच सामना खेळणाऱ्या इशान किशन ( Ishan Kishan) आणि किरॉन पोलार्ड ( Kieron Pollard) यांनी सामना खेचून आणला.

इशान 58 चेंडूंत 2 चौकार व 9 षटकार खेचून 99 धावांवर माघारी परतला अन् सामन्यात पुन्हा चुरस निर्माण झाली. पोलार्डला अखेरच्या चेंडूवर 5 एवजी चारच धावा करता आल्यानं MI ला 5 बाद 201 धावांवर समाधान मानावे लागले.

पोलार्डनं 24 चेंडूंत 3 चौकार व 5 षटकार खेचून नाबाद 60 धावा केल्या. त्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.

RCBच्या नवदीप सैनीनं ( Navdeep Saini) टिच्चून मारा करताना MIला 7 धावांवर रोखले आणि विराट कोहली व एबी यांनी हे लक्ष्य पार करून RCBला विजय मिळवून दिला.

ज्यानं हा सामना RCBच्या तोंडातून खेचून आणला तो इशान सीमारेषेवर बसून MIचा पराभव पाहत होता. हा पराभव त्याच्या नक्कीच जिव्हारी लागला असेल. त्याचा दुःखी चेहऱ्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि त्या फोटोनं अनेकांची मनं जिंकली आहे.