IPL 2020 : रैना, हरभजनसह सात 'मोठ्या' खेळाडूंनी घेतली माघार; त्यांच्या जागी कोण देणार संघांना आधार?

इंडियन प्रीमिअर लीगचे ( आयपीएल ) 13वे हंगाम सुरू होण्यासाठी अवघे 14 दिवस शिल्लक असूनही वेळापत्रक जाहीर न झाल्यानं क्रिकेटचाहते नाखुश आहेत. त्यात चेन्नई सुपर किंग्सच्या दोन खेळाडूंसह 11 सदस्यांना कोरोना लागण झाल्यामुळे स्पर्धा होणार की नाही, याबाबत साशंकता होती.

सुरेश रैना आणि हरभजन सिंग या अनुभवी खेळाडूंनही वैयक्तिक कारणास्तव माघार घेतल्यानं चाहत्यांच्या चिंतेत भर पडली. आतापर्यंत 19 सप्टेबंर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिराती येथे ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे.

आयपीएलला सुरुवात होण्यापूर्वी सुरेश रैना, हरभजन सिंगसह सात मोठ्या खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यांच्याजागी काहींनी बदली खेळाडू निवडले, तर काही नवे चेहरे दिसण्याची अपेक्षा आहे.

मुंबई इंडियन्सचा सर्वात अनुभवी गोलंदाज लसिथ मलिंगा यानंही वैयक्तिक कारणास्तव यंदाच्या आयपीएलमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला. 37 वर्षीय मलिंगानं आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या जागी मुंबई इंडियन्सनं ऑस्ट्रेलियाच्या जेम्स पॅटिन्सनची निवड केली आहे.

दिल्ली कॅपिटल्सलाही धक्का बसला आहे. ख्रिस वोक्सनं माघार घेतली आहे. त्याच्या जागी संघात आता अॅनरिच नॉर्त्झेची निवड झाली आहे.

हरभजन सिंगची माघार हा CSKला दुसरा मोठा धक्का होता. त्यानेही वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली. CSKनं त्यालाही रिप्लेसमेंट खेळाडू जाहीर केलेला नाही. पण, जलाज सक्सेना किंवा साई किशोर यांना संधी मिळू शकते.

दिल्ली कॅपिटल्सचा जेसन रॉयनंही आयपीएलमधून माघार घेतली. त्याला दुखापत झाली आहे. त्याच्या जागी डॅनिएल सॅम्सची निवड केली आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा केन रिचर्डसननंही माघार घेतली आहे. त्याची पत्नी गर्भवती आहे आणि तिच्यासोबत राहण्याचा त्यानं निर्णय घेतला. त्याच्या जागी संघास अॅडम झम्पाचे आगमन झाले आहे.

हॅरी गर्नीनं माघार घेत कोलकाता नाइट रायडर्सला धक्का दिला. पण, त्याच्या ख्रीस ग्रीन हा तगडा खेळाडू संघानं करारबद्ध केला.

सुरेश रैनानं वैयक्तिक कारणास्तव आयपीएलमधून माघार घेतल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्काच बसला. CSKचा तिसऱ्या क्रमांकावरील महत्त्वाचा खेळाडू असलेल्या रैनाची उणिव यंदाच्या आयपीएलमध्ये प्रकर्षाने जाणवेल. संघानं रैनाच्या जागी बदली खेळाडू म्हणून अद्याप कुणाची निवड केलेली नाही, परंतु रैनाच्या जागेवर संघात ऋतुराज गायकवाड किंवा अंबाती रायुडू यांना खेळण्याची संधी मिळू शकते.