टीम इंडिया करणार मोटेरा स्टेडियमवर सराव; पण, MS Dhoni ला 'नो एन्ट्री'!

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (आयसीसी) सोमवारी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2020 स्थगित झाल्याची घोषणा केली आणि इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) 13 व्या मोसमाचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) आता भारतीय खेळाडूंच्या सराव शिबिराच्या आयोजनाची तयारी सुरु केली आहे.

मागील तीनेक महिन्यांपासून भारतीय क्रिकेटपटू घरीच आहेत. कोरोना व्हायरसमुळे सर्व स्पर्धाच रद्द झाल्यामुळे आणि लॉकडाऊन असल्या कारणानं त्यांना घरी बसावं लागले. पण, आता आयपीएलच्या तयारीच्या दृष्टीनं त्यांना मैदानावर सरावासाठी घेऊन येण्याची तयारी बीसीसीआयनं सुरु केली आहे.

विराट कोहली आणि अन्य खेळाडूंचा सराव शिबिर अहमदाबाद येथील नव्यानं बांधण्यात आलेल्या मोटेरा स्टेडियमवर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण, भारतीय खेळाडूंच्या या सराव शिबिरात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला सहभागी होता येणार नाही.

गतवर्षीच्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूरच आहे. त्यानं त्याच्या भविष्याच्या निर्णयाबाबतही बीसीसीआयला कोणतीच कल्पना दिलेली नाही.

या कालावधीत तो केवळ चेन्नई सुपर किंग्सच्या ( CSK) सराव सत्रात सहभागी झाला होता, परंतु कोरोना व्हायरसमुळे तेही रद्द झाले आणि तो रांचीतील घरी परतला. आगामी सराव शिबिर हे आयपीएलसाठी आहे, परंतु धोनीला त्यात सहभाग घेता येणार नाही.

अहमदाबाद येथे होणारं शिबिर हे केवळ बीसीसीआयच्या करारबद्ध खेळाडूंसाठी असणार आहे. 2019-20च्या करारानुसार धोनीचा बीसीसीआयच्या सेंट्रल करारात समावेश नाही. त्यामुळे या सराव शिबिरासाठी तो पात्रच ठरत नाही.

मागील 12 महिन्यांपासून धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे आणि त्यामुळे बीसीसीआयच्या करारात त्याचा समावेश होणे शक्यच नाही.

या नियमानुसार अनेक खेळाडूंना सराव शिबिरात सहभागी होता येणार नाही, परंतु त्यांचा समावेश होणार नाही, अशी कोणतेच स्पष्टीकरण बीसीसीआयकडूनही देण्यात आलेले नाही.