India vs West Indies : टीम इंडियानं रचला विश्वविक्रम, पाकला टाकलं मागे!

गयाना, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारतीय संघाने तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातही वेस्ट इंडिजवर विजय मिळवत मालिका 3-0 अशी सहज खिशात घातली. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने उभे केलेले 6 बाद 146 धावांचे लक्ष्य भारताने 19.1 षटकांत 3 बाद 150 धावा करून सहज पार केले. वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशानंतर प्रथमच मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाने मैदान मारले.

तिसऱ्या सामन्यात दीपक चहरने 4 धावांत 3 विकेट्स घेतल्या. वेस्ट इंडिजविरुद्ध ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये भारतीय गोलंदाजाने नोंदवलेली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.

विंडीजविरुद्ध ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरीचा विक्रम कुलदीप यादवच्या नावावर होता. त्यानं 2018मध्ये कोलाकात येथे 13 धावांत तीन विकेट्स घेतल्या होत्या.

याच दौऱ्यात नवदीप सैनीनं टीम इंडियाकडून पदार्पण करताना 17 धावांत 3 विकेट्स घेतल्या होत्या आणि ती तिसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.

2016मध्ये अमित मिश्रानं 24 धावांत 3 विकेट्स घेतल्या होत्या.

वेस्ट इंडिजला ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सलग सहा वेळा पराभूत करण्याचा विश्वविक्रम टीम इंडियाने नावावर केला. भारताने 2018-19च्या दौऱ्यात वेस्ट इंडिजला सलग सहा सामन्यांत पराभूत केले आहे. पाकिस्तानने 2016-17 या कालावधीत सलग पाच विजय मिळवले होते आणि आता ते दुसऱ्या स्थानी सरकले आहेत. दक्षिण आफ्रिका ( 2008-10), श्रीलंका ( 2009-12), ऑस्ट्रेलिया ( 2010-12) आणि पाकिस्तान ( 2017-18) यांनी प्रत्येकी सलग चार विजय मिळवले आहेत.

भारताने ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये नोंदवलेला हा चौथा व्हाईटवॉश आहे. या मालिकाविजयापूर्वी भारताने ऑस्ट्रेलिया ( 2016), श्रीलंका ( 2017), वेस्ट इंडिज ( 2018) यांच्यावर निर्भेळ यश मिळवले आहे.

या पराभवानंतर विंडीजनं नकोसा विक्रम नावावर केला. ट्वेंटी-20त सर्वाधिक 58 पराभव आता विंडीजच्या नावावर नोंदवले गेले आहेत. त्यांनी श्रीलंका व बांगलादेश यांचा 57-57 पराभवाचा विक्रम मोडला.