विराट कोहलीचे 42वे शतकं अन् 8 विक्रम!

भारतीय संघाने दुसऱ्या वन डे सामन्यात वेस्ट इंडिजवर डकवर्थ लुईसनुसार 59 धावांनी विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात कर्णधार विराट कोहलीनं कारकिर्दीतले 42 वे शतक झळकावून अनेक विक्रमांना गवसणी घातली.

कोहलीचे हे 42वे शतक आहे आणि सचिन तेंडुलकरच्या शतकांशी बरोबरी करण्यासाठी त्याला सात शतकांची गरज आहे. त्याचे हे 67वे आंतरराष्ट्रीय शतक ठरलं, तेंडुलकर या क्रमवारीत 100 शतकांसह अव्वल स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर असलेल्या रिकी पॉटिंगला मागे टाकण्यासाठी कोहलीला चार शतकांची गरज आहे.

विराट कोहलीचे हे वेस्ट इंडिजविरुद्धचे 8 वे शतक आहे. केवळ सचिन तेंडुलकरला ( वि. ऑस्ट्रेलिया) एका प्रतिस्पर्धीविरुद्ध सर्वाधिक 9 शतकं करता आली आहेत. कोहलीनं विंडीजसह ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्याविरुद्ध प्रत्येकी आठ शतकं केली आहेत. तीन देशांविरुद्ध 8 किंवा त्यापेक्षा अधिक शतकं करणारा तो एकमेव फलंदाज आहे.

कर्णधार म्हणून कोहलीचे हे 20वे शतक आहे. या विक्रमात पॉटिंग 22 शतकांसह अव्वल स्थानावर आहे. कर्णधार आणि खेळाडू म्हणून 20 किंवा त्याहून अधिक शतकं असणारा कोहली हा एकमेव खेळाडू आहे. खेळाडू म्हणून पॉटिंगच्या नावावर 19 शतकं आहेत. कोहलीच्या 20 शतकांतील सहा शतकं हे वेस्ट इंडिजविरुद्धची आहेत. एकाच प्रतिस्पर्धी विरुद्धही एखाद्या कर्णधाराची सर्वोत्तम कामगिरी आहे.

कोहलीनं वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक 2032 धावा करण्याचा विक्रम नावावर केला. विंडीजविरुद्ध सर्वाधिक धावांचा जावेद मियादाँद यांचा 1930 धावांचा विक्रम त्याने मोडला.

विंडीजविरुद्ध कोहलीची सरासरी ही 72.57 इतकी आहे. 1500 हून अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

वेस्ट इंडिजविरुद्ध 2000 धावांचा पल्ला गाठण्यासाठी कोहलीनं 34 डाव खेळले. एकाच प्रतिस्पर्धीविरुद्ध सर्वात जलद हा पल्ला गाठणारा कोहली पहिलाच फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम रोहित शर्माच्या नावावर होता. त्यानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध 37 डावांत 2000 धावा केल्या होत्या.

कोहलीनं वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये आठवे स्थान पटकावले आहे. त्यानं 11406 धावांसह भारताचा माजी कर्णार सौरव गांगुली ( 11363) चा विक्रम मोडला. भारतीय फलंदाजांमध्ये तेंडुलकरनंतर कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे.

कोहीलीनं 125 चेंडूंत 120 धावा केल्या. वेस्ट इंडिजमध्ये कर्णधारानं केलेली ही सर्वोत्तम खेळी ठरली. त्याने ब्रायन लाराचा ( 116 वि. श्रीलंका, 2003) विक्रम मोडला.