टीम इंडिया कसोटी मालिकेत प्रयोग करणार, सलामीला तीन जोड्या आजमावणार!

ट्वेंटी-20 मालिका 1-1 अशा बरोबरीत सुटल्यानंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांनी आपला मोर्चा कसोटी मालिकेकडे वळवला आहे. 2 ऑक्टोबरपासून या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिला सामना विशाखापट्टणम येथे होणार आहे आणि सोमवारी टीम इंडयाने कसून सरावही केला.

या मालिकेत रोहित शर्माला कसोटीत सलामीला खेळताना पाहण्याची सर्वांना उत्सुकता आहे. रोहित वगळता मालिकेत टीम इंडिया तीन वेगवेगळ्या जोडींची सलामीला चाचपणी करणार आहे.

दक्षिण आफ्रिकाही काही नव्या चेहऱ्यांना सोबत घेऊन मैदानात उतरणार आहे. आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेंतर्गत असलेल्या या कसोटी मालिकेत विजय मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखण्याचा टीम इंडियाचा निर्धार आहे.

भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहला दुखापतीमुळे माघार घेतल्यानं कर्णधार विराट कोहलीची डोकेदुखी वाढली आहे. त्याच्या जागी संघात उमेश यादवला संधी देण्यात आली आहे. कसोटीत आफ्रिकेचे पारडे जड आहे. त्यांनी 36पैकी 15 सामने जिंकले आहेत, तर केवळ 11 मध्ये हार पत्करावी लागली आहे. 10 सामने अनिर्णीत राहिले आहेत.

गेल्या काही मालिकांमध्ये कसोटीत भारतीय संघाला सक्षम सलामी जोडी मिळालेली नाही. शिखर धवन, मुरली विजय, लोकेश राहुल, पृथ्वी शॉ, मयांक अग्रवाल अशा अनेक पर्यायांची चाचपणी झाली आहे.

आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत रोहित ओपनिंगला येणार आहे. त्याच्यासोबत मयांक अग्रवाल असेल. अग्रवालने 2017-18च्या स्थानिक क्रिकेटमध्ये सर्व फॉरमॅटमध्ये मिळून 2141 धावा केल्या आहेत. पृथ्वी शॉ जायबंद झाल्यामुळे मयांकला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर संधी मिळाली. त्यानं पदार्पणातच 76 धावा करताना आपली गुणवत्ता सिद्ध केली. रोहितनं कसोटीत सलामी कधी केलीच नाही, परंतु त्याला या मालिकेत ती संधी मिळण्याचे संकेत निवड समितीनं दिले आहेत.

रोहित अपयशी ठरल्यास मयांक आणि हनुमा विहारी यांना संधी मिळू शकते. हनुमानं आपल्या कामगिरीनं सर्वांचे लक्ष वेधले आहे. आंध्रप्रदेशच्या या खेळाडूनं 60 च्या सरासरीनं स्थानिक क्रिकेटमध्ये धावा चोपल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्यानं टीम इंडियाकडून पदार्पण केले. त्यानं आतापर्यंत सहा कसोटी सामन्यांत 45.60 च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. हनुमा शांत आणि संयमी आहे, तर अग्रवाल आक्रमक फलंदाज आहे. त्यामुळे हाही पर्याय वापरला जाऊ शकतो.

मयांक आणि विहारी या युवा खेळाडूंकडे टीम इंडियाचे भविष्याचे स्टार म्हणून पाहिले जात असले तरी रोहितचा अनुभव या मालिकेत कामी येणार आहे. रोहितला कसोटीत सलामीला खेळण्याचा अनुभव नसला तरी तो या मालिकेत हेही आव्हान यशस्वीपणे पेलेल, असा विश्वास आहे. त्यामुळे रोहित आणि हनुमा हा तिसरा पर्याय असू शकतो.