Rohit Sharma दुखापतग्रस्त, टीम इंडियातील रिक्त स्थान भरण्यासाठी चौघे शर्यतीत!

ट्वेंटी-20 मालिकेतील विजयानंतर टीम इंडियाचे लक्ष वन डे आणि कसोटी मालिकेकडे लागले आहे. पण, वन डे मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. पाचव्या ट्वेंटी-20 सामन्यात रोहित शर्माला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले होते. त्यामुळे तो वन डे आणि कसोटी मालिकेतून माघार घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

रोहितनं पाचव्या सामन्यात 41 चेंडूंत 3 चौकार व 3 षटकार खेचून 60 धावा चोपल्या. पण, दुखापतीमुळे त्याला मैदान सोडावे लागले. तसे झाल्यास हिटमॅनला बदली म्हणून चार खेळाडू शर्यतीत आहेत.

मयांक अग्रवालनं कसोटी मालिकेत आपलं नाणं खणखणीत वाजवलं आहे. वन डे मालिकेत त्याला संध मिळण्याची शक्यता आहे. मयांक सध्या न्यूझीलंड दौऱ्यावरच आहे आणि भारत अ संघाचे प्रतिनिधित्व करताना त्यानं साजेशी कामगिरी केली आहे.

शुबमन गिल हा वन डे आणि कसोटी संघासाठी एक सक्षम पर्याय ठरू शकतो. भारत अ संघाचे प्रतिनिधित्व करताना त्यानं न्यूझीलंड दौऱ्यावर दुहेरी शतक झळकावले आहे. शिवाय तो न्यूझीलंड संघाविरुद्धच्या वन डे संघासाठी निवडलेल्या टीम इंडियाचा सदस्यही आहे.

पृथ्वी शॉ दुखापतीतून नुकताच सावरला आहे आणि त्यानं दमदार खेळ करताना झोकात पुनरागमनही केलं आहे. शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्यानंतर वन डे मालिकेसाठी त्याची निवड करण्यात आली. शिवाय तो कसोटीतही फिट बसतो.

लोकेश राहुलनं आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. ट्वेंटी-20 मालिकेत यष्टिंपुढे आणि मागेही त्यानं प्रभाव पाडला आहे. स्पर्धेत सर्वाधिक धावा करत त्यानं मालिकावीराचा पुरस्कारही पटकावला. त्यामुळे रोहितला योग्य पर्याय म्हणून लोकेश आघाडीवर आहे.