न्यूझीलंड मालिकेतील अपयश; टीम इंडियाच्या कसोटी संघातून तीन खेळाडूंना मिळू शकतो डच्चू!

न्यूझीलंड दौऱ्यात ट्वेंटी-20 मालिकेत 5-0 असा दणक्यात विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाला वन डे आणि कसोटी मालिकेत सपशेल मार खावा लागला. कसोटी मालिकेतील पराभव टीम इंडियाच्या आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याच्या मोहीमेला धक्का देणारा ठरला आहे.

न्यूझीलंड संघानं पहिल्या कसोटीत 10 विकेट्स आणि दुसऱ्या कसोटीत 7 विकेट्स राखून सहज विजय मिळवताना टीम इंडियाच्या खेळाडूंच्या सर्व मर्यादा उघड केल्या. त्यामुळे आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील पुढील मालिकांपूर्वी टीम इंडियाला संघबांधणीच्या दृष्टीने आतापासूनच विचार करावा लागणार आहे.

जागतिक कसोटीत अव्वल असलेल्या टीम इंडियाच्या फलंदाजांनी या मालिकेत शरणागती पत्करलेली पाहायला मिळाली. टीम इंडियाला चार डावांमध्ये 165, 191, 242 आणि 124 धावा करता आल्या.

भारतीय संघ आगामी कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकांसाठी टीम इंडियाच्या व्यवस्थापनाला काही कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत. त्यानुसार सध्याच्या संघातील तीन खेळाडूंना डच्चू मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आर अश्विन आता कसोटी संघापुरता मर्यादित राहिला आहे. 2017मध्ये त्यानं अखेरचा वन डे व ट्वेंटी-20 सामना खेळला होता. कसोटी संघातील त्याचे स्थान भक्कम होते. पण, 2018च्या इंग्लंड दौऱ्यात तो अपयशी ठरला, तेच दुसरीकडे इंग्लंडच्या मोईन अलीनं भारतीय फलंदाजांना नाचवले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही अश्विन काहीच करिष्मा दाखवू शकला नाही.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात झालेल्या मालिकेत अश्विननं दमदार पुनरागमन केले, परंतु तंदुरुस्तीमुळे त्याच्या कामगिरीवर परिणाम झाला. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्याला केवळ तीन विकेट्स घेता आल्या आणि त्यामुळे दुसऱ्या सामन्यात रवींद्र जडेजाला संधी मिळाली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत त्याला डच्चू दिला जाऊ शकतो.

मायदेशात कसोटी मालिकेसाठी उमेश यादव हा टीम इंडियाचा पहिला पर्याय असतो, परंतु परदेश दौऱ्यावर अंतिम अकरामध्ये त्याच्या नावाचा विचारही केला जात नाही. उमेश यादव हा संघातील सर्वाधिक तंदुरुस्त गोलंदाज आहे आणि तो सातत्यानं 90mph च्या वेगानं मारा करू शकतो. पण, त्याला दुसऱ्या कसोटीत केवळ दोन विकेट घेता आल्या.

इशांत शर्मानं दुखापतीमुळे माघार घेतल्यानं उमेशला संधी मिळाली, परंतु त्याला प्रभाव पाडता आला नाही. त्यानं 46 कसोटीत 144 विकेट्स घेतल्या आहेत आणि यातील बहुतेक विकेट्स या घरच्या मैदानावर घेतलेल्या आहेत. त्यामुळे आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याला संधी मिळणे अवघडच आहे. यापूर्वी त्याला तीन वेळा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर नेण्यात आले, परंतु त्याला छाप पाडता आली नाही.

डच्चू मिळणाऱ्या खेळाडूंमध्ये अजिंक्य रहाणे हे मोठं नाव असू शकतं. एकेकाळी संघातील सर्वात भरवशाचा फलंदाज असलेला रहाणे आज चाचपाडताना दिसत आहे. न्यूझीलंड दौऱ्यात त्याला अपयशी आले. पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात त्यानं 46 धावा केल्या, परंतु त्यानंतर किवी गोलंदाजांसमोर तो अपयशी ठरला.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रहाणेनं 15 कसोटीत 44 च्या सरासरीनं 616 धावा केल्या आहेत. त्यात एक शतक आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे. पण, त्याचा सध्याचा फॉर्म पाहता त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे.