टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कमावलं, फलंदाजांनी गमावलं; जाणून घ्या सामना कुठे फिरला!

भारतीय संघाचा पहिला डाव 242 धावांवर गुंडाळून न्यूझीलंडच्या सलामीवीर टॉम ब्लंडल आणि टॉम लॅथम यांनी पहिल्या दिवसअखेर बिनबाद 63 धावा करताना चांगली सुरुवात केली.

पण, दुसऱ्या दिवसाचे पहिले सत्र भारतीय गोलंदाजांनी गाजवले. इशांत शर्माच्या जागी संघात स्थान मिळालेल्या उमेश यादवनं टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले.

उमेश यादवनं टाकलेल्या 26व्या षटकात किवी ओपनल ब्लंडल पायचीत झाला. ब्लंडलनं 30 धावा केल्या.

त्यानंतर जसप्रीत बुमराहनं टीम इंडियाला महत्त्वपूर्ण विकेट मिळवून दिली. त्याने किवी कर्णधार केन विलियम्सनला ( 3) रिषभ पंतकरवी झेलबाद केले.

आर अश्विनच्या जागी संघात स्थान मिळालेल्या रवींद्र जडेजानं किवीच्या रॉस टेलरला ( 15) बाद करून टीम इंडियाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा दूर केला.

मोहम्मद शमीनं किवींना एकामागोमाग एक धक्के दिले. त्यानं सलामीवीर टॉम लॅथमला ( 52) आणि हेन्री निकोल्सला ( 14) बाद केले.

भारताच्या पहिल्या डावातील 242 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा निम्मा संघ 133 धावांत तंबूत परतला होता. त्यामुळे टीम इंडियाला मोठी आघाडी घेण्याची संधी होती.

लंचनंतर बुमराहनं किवींच्या बीजे वॉटलिंगला भोपळाही फोडू दिला नाही. टीम साऊदीही ( ०) त्याच षटकात बाद झाल्यानं किवींची अवस्था 7 बाद 153 अशी झाली होती.

पण, कॉलीन डी ग्रँडहोम, कायले जेमिसन आणि नील वॅगनर या तळाच्या खेळाडूंनी टीम इंडियाच्या मनसुब्यावर पाणी फिरवले.

रवींद्र जडेजानं कॉलीन डी ग्रँडहोमला बाद केले. पण, जेमिसन व वॅगनर यांनी 9व्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी करताना किवींना दोनशे धावांचा पल्ला सहज पार करून दिला.

जेमिसन व वॅगनर यांची अर्धशतकी भागीदारी सामन्यातील टर्निंग पॉईंट ठरली. त्यांच्या या भागीदारीच्या जोरावर किवींनी पहिल्या डावात 235 धावा केल्या.

अवघ्या 7 धावांच्या आघाडीसह दुसऱ्या डावात मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाच्या आघाडीच्या फलंदाजांना पुन्हा अपयश आले.

पृथ्वी शॉ ( 14), मयांक अग्रवाल ( 3), चेतेश्वर पुजारा ( 24), विराट कोहली ( 4) आणि अजिंक्य रहाणे ( 9) अवघ्या 84 धावांत माघारी परतले.

नाइट वॉचमन उमेश यादव ( 1) बाद झाल्यानं टीम इंडियाची दुसऱ्या दिवसअखेर अवस्था 6 बाद 90 अशी झाली आहे.

टीम इंडियाकडे 97 धावांची आघाडी आहे आणि रिषभ पंत व हनुमा विहारी यांच्या खांद्यावर आता संपूर्ण जबाबदारी आहे.